आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्व्हर डाऊन, व्यवहार ठप्प !, तीन दिवसांत थांबणार 3 हजार कोटींचे व्यवहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मंगळवारपासून सलग तीन दिवस बँका बंद असल्याने सोमवारी व्यवहारासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना ‘सर्व्हर डाऊन’ चा झटका बसला. शहरातील काही शाखांचे व्यवहार या तांत्रिक अडचणीमुळे अर्धा दिवस बंदच होते. दरम्यान, पुढील तीन दिवस शहरातील सर्व बँका बंद राहणार असल्याने किमान 3 हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प होणार आहेत. त्याशिवाय संपामुळे एटीएमही मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी रिकामे होतील.

मंगळवारी शिवजयंतीची सुटी आणि बुधवार-गुरुवारी दोन दिवसांचा संप यामुळे बँका बंद राहणार आहेत. त्याआधीच व्यवहार उरकण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांत गेलेल्या शेकडो ग्राहकांना रखडत राहावे लागले. सर्व्हर अचानक डाऊन झाले आणि सारी यंत्रणा कोलमडली. काही शाखांमध्ये तर ग्राहकांची गर्दी, पण काडीचे काम नाही, असे चित्र पाहायला मिळाले. बजरंग चौकातील शाखेत ग्राहकांना यंत्रणा सुरू होण्याची वाट पाहण्यात तीन-चार तास घालवावे लागले. व्यवस्थापक एस. पी. बोर्डे यांनी सर्व्हरचे कारण पुढे करीत ग्राहकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. इतर राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाजही सर्व्हरच्या अडचणीमुळे ठप्प झाल्याचे त्यांनी सांगितले. एसबीआयचे महाव्यवस्थापक शिवचरण फोकमारे यांनी सांगितले की, दोन तास सर्व्हर डाऊन होते. मुंबईतील तांत्रिक बिघाडामुळे परिस्थिती उद्भवली. काही वेळानंतर यंत्रणा सुरळीत सुरू झाली. तीन दिवसांच्या सुट्यांमुळे ग्राहकांचा खोळंबा होऊ नये यासाठी एसबीआयने सोमवारी जादा दोन तास बँक कामकाज सुरू ठेवले होते.

सुटी आणि संप : मंगळवारी शिवजयंतीची सार्वजनिक सुटी असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर 20 आणि 21 फेब्रुवारी हे दोन दिवस बँक अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा सार्वत्रिक संप आहे. त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहतील. या काळात आर्थिक उलाढाल ठप्प होऊन ग्राहकांना त्यांचे व्यवहार पुढे ढकलावे लागणार आहेत. प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद शहरात दररोज किमान 1 हजार कोटी रुपयांचे व्यवहार होतात. त्यानुसार तीन दिवसांत किमान तीन हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प होणार आहेत.

एटीएमवर येणार ताण

तीन दिवस बँका बंद असल्याने एटीएमवर मोठा ताण येणार आहे. शहरात सर्व बँकांची 140 एटीएम आहेत. एका मशीनमध्ये दररोज 40 लाख रुपये भरले जातात. शिवचरण फोकमारे यांनी सांगितले की, एसबीआयची एटीएम तीनही दिवस सुरू राहावीत यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. संप काळातही एटीएममध्ये रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या कामांना बसणार फटका

मार्च एंडिंगचे वेध लागल्याने बँकांतील व्यवहार वाढले आहेत. ते तीन दिवस पुढे ढकलावे लागतील. चार्टर्ड अकाउंटंट पंकज कलंत्री म्हणाले की, देणी चुकती करणे, करभरणा, रोजचे कलेक्शन, मार्च एंडिंग यामुळे गुंतवणूक कामे या काळात वेगात सुरू असते. त्यास संपाचा फटका बसणार आहे.

मंगळवारी मोर्चा, बुधवारी धरणे

‘एआयबीईए’चे देविदास तुळजापूरकर, जगदीश भावठाणकर, सुनील शिंदे, एन. आर. मालू, अरुण जोशी, रवी धामणगावकर, भाऊसाहेब देशमुख यासह इतर संघटनांच्या पदाधिकार्‍यांची सोमवारी बैठक झाली. त्यात आंदोलनाचा तपशील निश्चित केला. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता महाराष्ट्र बँकेच्या क्रांती चौक शाखेसमोर निदर्शने होतील. त्यानंतर आयुक्तालयावर मोर्चा काढला जाईल. 21 तारखेला क्रांती चौकात धरणे होतील.

कशासाठी संप ?
0 सर्व बँक कर्मचारी-अधिकारी संघटनांनी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला असून त्यात शहरातील 5 हजारांहून अधिक कर्मचारी व अधिकारी सहभागी होणार आहेत. त्यांच्या मागण्या अशा :
0 महागाई, बेरोजगारी, दुष्काळ निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना करा
0 बोनस, ग्रॅच्युइटी, पीएफवरील र्मयादा उठवा, सर्वांना पेन्शन लागू करा.
0 कंत्राटी कामगारांना कायम करा.
0 कर्मचारीहिताच्या विरोधातील बँकिंग क्षेत्रातील सुधारणा थांबवा.