आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक कामातून मोकळीक मिळवून देण्यासाठी सौदेबाजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकीच्या प्रशासकीय कामातून मोकळीक मिळवून  देण्यासाठी निवडणूक विभागात काही कर्मचाऱ्यांकडून आर्थिक सौदेबाजी करून ड्यूटी रद्द केल्याच्या अजब कारभाराची चर्चा दिवसभर येथे रंगली होती. जवळपास चांगलीच रक्कम ड्यूटी रद्द करण्याच्या नावाखाली संबंधितांनी कर्मचाऱ्यांकडून उकळली असल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर स्पष्ट केले. दरम्यान, असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करू, असे निवडणूक निर्णय अधिकारी संदिपान सानप यांनी सांगितले.  
 
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय पक्षांप्रमाणेच प्रशासन सज्ज झाले आहे. तालुक्यातील २३४ मतदान केंद्रांवर पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, निवडणूक विभागातील सहकारी कर्मचाऱ्याला लक्ष्मीदर्शन घडवून काही बहाद्दरांनी राष्ट्रीय कार्य असलेल्या निवडणुकीच्या कामातून स्वतःची सुटका करून घेतली आहे, तर काहींनी अपेक्षापूर्ती करूनही त्यांना वाॅरंट आल्याने अपेक्षाभंग होऊन धुसफूसही या ठिकाणी पाहावयास मिळाली.  
 
निवडणुकीच्या काळात शिक्षकांसह विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात येतात. या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर तसेच नियंत्रण कक्षात वेगवेगळ्या कामांची जबाबदारी सोपवण्यात येते. निवडणूक विभागाने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सुमारे १७०० कर्मचाऱ्यांना पहिल्या प्रशिक्षणासाठी वाॅरंट बजावले होते. यातून शिक्षिकांसह आजारी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले होते. वास्तविक पाहता २३४ मतदान केंद्रांवर १२०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना प्रशासनाने वाढीव कर्मचाऱ्यांना वाॅरंट का बजावले, हा प्रश्न पडला आहे.   दरम्यान, निवडणूक विभागात कार्यरत असलेल्या एक-दोघांनी राष्ट्रीय कार्यातून मुक्त करण्याची समाजसेवा शाखा सुरू केली होती. या सेवेच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर मेवा जमा करण्यात आला आहे. मतदानाचे काम मिळालेले या जाचक कामातून सुटका व्हावी यासाठी दक्षिणा देऊन मुक्त झाले.  
शिक्षक नेते मुक्तच : राजकीय पक्षांशी निगडित असलेल्या शिक्षक संघटनांच्या नेत्यांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात येते हा शिरस्ता या वर्षीही कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एक हजार कर्मचाऱ्यांच्या यादीवर नजर टाकली असता यात एकाही शिक्षक नेत्याचे नाव दिसून येत नाही.  दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी वाॅरंट बजावण्यात आलेल्यातील काहींची नावे वगळण्यासाठी एका बड्या अधिकाऱ्याने कोतवालामार्फत संबंधित कर्मचाऱ्याकडे यादी पाठवली होती. ही यादी बाजूला सारत यातील कर्मचाऱ्यांना अखेरचे वाॅरंट देण्यात आले होते.

योग्य वाटलेल्यांनाच वगळले : डॉ. सानप
मतदानाच्या कामातून वगळण्यासाठी भरपूर अर्ज प्राप्त झाले होते. यातील ज्यांची समस्या योग्य वाटली त्यांचीच यातून सुटका केली असून बाकीचे अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.संदिपान सानप यांनी सांगितले. मात्र असे किती अर्ज आले व किती मंजूर करण्यात आले याचा आकडा निवडणूक विभागाकडे उपलब्ध नव्हता.

पार्टी द्या, नाव वगळा....  
एकीकडे मतदान करावे यासाठी उमेदवार मतदारांना जेवणावळीसह ओल्या पार्ट्या दिल्या जातात. मात्र येथे निवडणुकीच्या कामातून वगळण्यासाठी नगद नारायण देण्याऐवजी काहींनी संबंधितांकडून ओल्या पार्ट्या घेतल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सध्या ऐकावयास मिळत आहे.
बातम्या आणखी आहेत...