आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडोद्याच्या 'स्मार्ट' योजना लाभदायी! प्रक्रिया केल्याने ड्रेनेजचे पाणी होते पिण्यायोग्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या औरंगाबाद शहरासाठी गुजरातेतील बडोदा येथील योजना लाभदायी ठरू शकतात. शहरवासीयच नव्हे, तर मनपाचीही डोकेदुखी ठरलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बडोद्याच्या धर्तीवर प्रकल्प राबवणे गरजेचे आहे. कचरा जमा करून त्यावर प्रक्रिया करून ऑइल आणि गॅसनिर्मिती केली जाते, तर पिण्याव्यतिरिक्त वाहून जाणाऱ्या ८० टक्के पाण्यावर प्रक्रिया करून ड्रेनेजचे केमिकलचे पाणी अवघ्या १५ ते २० लाख रुपयांत पुन्हा वापरात आणले जाते. याच योजना शहरात राबवण्यासाठी मनपाच्या वतीने पावले उचलली जात आहेत.

बडोद्यात अत्यंत कमी खर्चात आणि योग्य नियोजनाद्वारे वाया जाणारे पाणी आणि कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी गेल्या आठवड्यात महानगरपालिकेचे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या बडोदा अभ्यास दौऱ्यावर गेले होते. त्यात उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, शहर अभियंता सखाराम पानझडे, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त रवींद्र निकम, भाजपचे भगवान घडामोडे, उद्योजक राम भोगले, आमदार हरिभाऊ बागडे आदींचा समावेश होता. या शिष्टमंडळाने बडोद्यापासून २५ किलोमीटर अंतरावरील मकरपुरा येथील ट्रान्सकेम केमिकल कंपनीच्या प्रकल्पाची पाहणी केली. कंपनीने ड्रेनेजचे आणि केमिकल मिश्रित वाया जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून उद्याने आणि वापरण्यासाठी उपयुक्त पाणी मिळवले. याहीपुढे जाऊन नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून हे पाणी थेट पिण्यासाठीही वापरात आणले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे पाणी तपासून पाहिले होते. १०० लिटर दूषित पाण्यातून ८० लिटर उपयुक्त पाणी मिळवता येते. केवळ २० लिटर पाणी वाया जाते. हे पाणीही खत म्हणून वापरले जाते. कंपनीने त्या खताचा वापर ३५ हजार वृक्षांसाठी केला आहे. या प्रकल्पासाठी दिल्ली जल बोर्डाने निधी दिला तर राज्य शासनाने पेटंटही दिले आहे.

कंपनीने अगदी एक हजार चौरस फूट जागेत हा प्लँट तयार केला आहे. त्यासाठी बायोफिल्टर तयार केले आहे. माती, झाडपाला आणि इतर साहित्य एका चौकोनी चाळणीत जमा केले जाते. ते एका मोठ्या डब्यात तीन थरांत ठेवण्यात येते. त्यावर ड्रेनेजचे पाणी ठिबक सिंचनप्रमाणे हळूहळू सोडले जाते. हे पाणी तीन डब्यांतून फिल्टर होऊन एका टाकीत साठवण्यात येते. हेच स्वच्छ पाणी एका वेगळ्या टाकीत सोडले जाते. ज्यावर नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रक्रिया करून ते थेट पिण्यायोग्य केले जाते.