आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील मद्यालयांत वेटिंग; मेन्यू कार्ड गायब, सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सर्वाेच्च न्यायालयाच्या दणक्याने झालेली हायवेवरील मद्यविक्री बंदी शहरातील हॉटेलचालकांच्या पथ्यावर पडली आहे. शहरातील बिअर बार आणि परमिट रूम ओसंडून वाहत आहेत. बसण्यासाठी जागाच नसल्याने अनेक ठिकाणी उभ्या उभ्याच मद्यप्राशन सुरू आहे. तर याचा फायदा घेण्यासाठी विक्रेत्यांनी किमतीत वाढ केली आहे.
 
अनेक हॉटेलमधून मेन्यू कार्डही गायब झाले आहे. पिणारे ग्राहक आवरताना नाकी नऊ येत असल्यामुळे काही हॉटेल्सनी तात्पुरते किचन बंद केले आहे. या निर्णयामुळे विक्रेत्यांची चांदी तर मद्यपींची अडचण झाली आहे.
 
सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महामार्ग आणि त्यापासून ५०० मीटर अंतरावरील परमिट रूम, बार, बिअर शॉपी, वाइन शॉपी आणि देशी दारूच्या दुकानांमध्ये मद्यविक्री बंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात ५०६ तर महानगरपालिका हद्दीत १६६ मद्यालयांना या निर्णयामुळे टाळे लागले. याचा थेट फायदा शहरांतर्गत येणाऱ्या मद्यालयांना झाला आहे. शहरातील परमिट रूम आणि बार ओसंडून वाहत आहेत. पूर्वी क्वचितच ग्राहक मिळणाऱ्या बारमध्ये आता पाय ठेवायलाही जागा नाही. बंदी आदेशाची कल्पना आल्यामुळे या मद्यालयांनी बार चकाचक करून घेतले होते. जकात नाक्याजवळील एका बार व्यवस्थापकाने बंदीनंतर ग्राहकांची संख्या दुपटीपेक्षा अधिक वाढल्याचे सांगितले. पूर्वी टेबल रिकामे राहायचे. आता बसायलाही जागा नाही. यामुळे अनेक जण उभ्या उभ्याच मद्यप्राशन करतात. आम्हालाही पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
परमिट रूमचा मुख्य व्यवसाय तेथे चालणाऱ्या किचनवर असतो. मद्यपींची संख्या वाढल्यामुळे टेबलसाठी वेटिंग लागत आहे. यामुळे शहागंज भागातील एका परमिट रूमने किचन तात्पुरते बंद केले आहे. त्याऐवजी पॅक स्नॅक्स विकले जात आहेत. अनेक बारनी किचन बंद केल्याचे इथल्या मालकाने सांगितले. मद्यविक्री तीनपटीने वाढल्यामुळे किचनचा व्यवसाय यातूनच कव्हर होत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, बंदीचा फायदा घेण्यासाठी परमिट रूमचालक सरसावले आहेत. अनेक हॉटेल्समधून मेन्यू कार्ड गायब झाले आहेत.
 
दरात मोठी वाढ
परमिटरूममध्ये बंदीपूर्वी १८० रुपयांत मिळणारी बिअर आता २२० ते २८० रुपयांत विकली जात आहे. राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक शिवाजी वानखेडे यांच्या मते परमिट रूम्सनी किती मद्यविक्री करायची यावर कोणतेच बंधन नाही. तर सर्व्हिस टॅक्सच्या नावाखाली ते छापील किमतीपेक्षा अधिक दरातही मद्यविक्री करू शकतात. याबाबत तक्रार करता येत नाही. मात्र, बिअर शॉपी किंवा वाइन शॉपवर छापील किमतीपेक्षा अधिक दरात विक्री केल्यास गुन्हा दाखल करता येतो. असेे प्रकार आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...