आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Be Alert। Xerox Copy May Reach To The Terrorist

सावधान ! झेरॉक्स प्रती अतिरेक्यांपर्यंत पोहोचू शकतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - झेरॉक्स करताना तुमच्या कागदपत्रांच्या अधिक प्रती काढून त्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्याचा धोका असल्याचा इशारा एटीएसने दिला आहे. या पार्श्वभूमीवर झेरॉक्सच्या प्रती काढताना नागरिकांनी दक्षता घ्यावी, यासाठी एटीएसतर्फे बैठकांद्वारे जनजागरण करणे सुरू आहे.

पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेगला न्यायालयाने नुकतीच फाशीची शिक्षा ठोठावली. मला झालेल्या शिक्षेचा सूड यासीन भटकळ घेईल, अशी धमकी बेगने दिली होती. त्या पार्श्वभूमीवर घातपाती कारवाया होण्याची शक्यता लक्षात घेऊन दहशतवादीविरोधी पथक जोमात कामाला लागले आहे. त्याप्रमाणे शहराचा कोपरान् कोपरा पिंजून काढला जात आहे.

सिनेमागृहे, भित्तिपत्रके, माहितीपत्रकांच्या आधारे दक्षता घेण्याचे व संशयितांबद्दल पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले जात आहे. शहर आणि ग्रामीण भागात विविध ठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत. मास्टर माइंड यासीन भटकळ, वसीम अख्तर ऊर्फ मोनू, असदउल्लाह अख्तर ऊर्फ जावेद अख्तर आणि वकास ऊर्फ अहेमद हे चौघे दहशतवादी फरार आहेत. यांचा शोध घेण्यासाठी 25 एप्रिलपासून एटीएसने नव्याने मोहीम हाती घेतली आहे. सिनेमागृह, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, मॉल्स येथे दहशतवाद्यांबाबतची माहिती नागरिकांना दिली जात आहे. यातील प्रत्येकावर एटीएसच्या वतीने दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. एटीएसचे पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे, उर्वरित पान.6
उपनिरीक्षक गोरख जाधव, जगन्नाथ फुलवाडकर, विजय तुपे, योगेश सावंत, युनूस पठाण, बंडू पगारे, मनीष सूर्यवंशी दररोज शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृतीसाठी बैठका घेत आहेत. शहरातील प्रत्येक सिनेमागृहाला पोलिसांनी सीडीचे वाटप केले आहे. दहशतवाद्यांबाबत माहिती देणार्‍यांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे एटीएसच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.


झेरॉक्स काढताना बाळगा सावधगिरी
पॅन कार्ड, मतदान कार्ड, कार्यालयीन ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, लाइट बिल यांसह महत्त्वाच्या कागदपत्रांची झेरॉक्स काढत असताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. आवश्यक तेवढय़ा झेरॉक्स कॉपीच काढाव्यात तसेच दुकानदारही किती कॉपी काढतो याकडे लक्ष ठेवावे. महत्त्वाच्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत काढून आणण्याचे काम विश्वासातील व्यक्तीलाच सांगावे.या कागदपत्रांचा गैरवापर करून अनोळखी व्यक्ती त्याआधारे मोबाइलचे सिमकार्ड खरेदी करू शकतो. तसेच याद्वारे गुन्हा घडल्यास पोलिस तुम्हाला अटक करू शकतात, अशी जनजागृती केली जात आहे.

अधिकच्या झेरॉक्स काढू नका
ग्राहकाने जेवढय़ा झेरॉक्स कॉपी मागितल्या आहेत तेवढय़ाच दुकानदारांनी काढाव्यात. अधिकच्या प्रती निघाल्यास त्या तत्काळ नष्ट कराव्यात. तसेच नागरिकांनीदेखील आवश्यक तेवढय़ा कॉपी काढाव्यात. राजेंद्र तनेजा, अध्यक्ष, औरंगाबाद झेरॉक्स व्यापारी असोसिएशन.

प्रॉपर्टी डीलर्सना आवाहन
प्रॉपर्टी डीलर्स कमिशनपुरता विचार करून कोणत्याही अज्ञात व्यक्तीला राहण्यासाठी घर किंवा फ्लॅट मिळवून देतात. मात्र, त्यांनी तसे न करता त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर खात्री करून त्याला घर किंवा फ्लॅट मिळवून द्यावा. अज्ञात किंवा संशयित व्यक्ती आढळल्यास त्यांनी एटीएस किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.