आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: सिडको एन-3 शाळेजवळच थाटली बिअर शॉपी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणार्‍या सिडको एन-3 भागात एका शाळेजवळच बिअर शॉपी थाटण्यात आली आहे. कोणतीही शहानिशा न करता उत्पादन शुल्क विभागाने या शॉपीला परवाना दिल्याने या भागातील नागरिक संतप्त झाले आहेत. नगरसेवकासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क विभागाकडे नागरिकांनी निवेदने देऊन हे दुकान हटवण्याची मागणी केली, मात्र कुणीही या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्यास तयार नाही.
शहरातील अवैध मद्यविक्रीच्या बाजारावर डीबी स्टारने ‘बेबंदशाही’ या मथळ्याखाली सचित्र वृत्तमालिका प्रसिद्ध करून संपूर्ण शहरच कसे दारुड्यांच्या कब्जात गेले आहे, याचा पर्दाफाश केला. कानाकोपर्‍यात हा त्रास असल्याने शहरभर या एकाच विषयावर चर्चा होत आहे. जनतेच्या मनातील प्रश्न उचलून धरल्याने अनेकांनी फोन करून आपल्या भागातही असाच त्रास असल्याचे सांगितले. रोज अनेकांच्या तक्रारी चमूकडे येत आहेत. त्यापैकीच सिडको एन-3 भागात एका शाळेजवळच बिअर शॉपी असल्याची तक्रार आली. सगळीकडे दाद मागून थकल्यावर येथील नागरिकांनी अखेर डीबी स्टारकडे आपली कैफियत मांडली.
काय आहे प्रकरण?
सोन्या-चांदीच्या व कापड दुकानांच्या गर्दीत पंधरा दिवसांपूर्वीच पवन बिअर अँड वाइन शॉपी नावाचे छोटेसे पण अद्ययावत दुकान सुरू झाले. आता येथे मद्यशाळा सुरू होणार या भीतीने नागरिक त्रस्त झाले आहेत.
नागरिक एकत्र आले
ऐन दिवाळीच्या धामधुमीत पवन बिअर अँड वाइन शॉपी अगदी दर्शनी भागात सुरू होत असल्याचे दिसताच नागरिकांनी या भागाचे नगरसेवक प्रमोद राठोड यांना कल्पना दिली. राठोड यांनी तत्काळ विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, पोलिस आयुक्त, मुकुंदवाडी पोलीस ठाणे, एवढेच नव्हे तर पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांना निवेदने दिली. नागरिकांनीही सह्यांची मोहीम राबवली. ज्येष्ठ नागरिक व महिलांनी हरकतीचे पत्रही दिले, मात्र या दुकानाविरुद्ध कुठलीही कारवाई झाली नाही. कारवाईची मुख्य जबाबदारी असणार्‍या उत्पादन शुल्क विभाग, पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन या तिन्ही विभागांनी दखल घेतली नाही.
शाळेचे नगरसेवकाला पत्र
या भागात टॉडलर्स ही इंग्रजी माध्यमाची जुनी शाळा आहे. ही शाळा गेल्या पंधरा वर्षांपासून येथे आहे. शाळा, महाविद्यालये आणि मंदिरापासून 75 मीटरपर्यंतच्या परिसरात दारूचे दुकान असू नये, असा शासनाचा नियम आहे. पण हा नियम धाब्यावर बसवत ही बिअर शॉपी शाळेच्या अगदी जवळ म्हणजे 50 मीटर अंतरावर असल्याचा नागरिकांचा दावा आहे. लहान मुले व महिलांची यामुळे कुचंबणा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
आधी शाळा, मग शॉपी
पवन बिअर अँड वाइन शॉपी काही दिवसांपूर्वीच येथे सुरू झाली. त्यामुळे आधी शाळा की शॉपी असा युक्तिवाद करता येत नाही. पण उत्पादनापुढे काहीही न दिसणार्‍या उत्पादन शुल्क विभागाने कोणतीही पाहणी न करताच शाळेजवळ ही शॉपी उघडण्यास मंजुरी दिली.
मी दुकान हटवणारच
आमच्या वॉर्डातील अवैध दारूविक्री थांबवून काही महिने लोटत नाही तोच हे दुसरे संकट उभे राहिले आहे. दुकान सुरू होईपर्यंत मला कल्पना नव्हती. पवन बिअर अँड वाइन शॉपी शाळेपासून 50 मीटर अंतरावर आहे. आमचा वॉर्ड सुशिक्षित नागरिकांचा आहे. जिल्हाधिकार्‍यांना मी लेखी निवेदन दिले आहे. वेळ पडली तर आम्ही मतदानाला सामोरे जाऊन ते दुकान हटवू.
-प्रमोद राठोड, नगरसेवक
थेट सवाल: विजयसिंग जाधव, मालक, पवन बिअर अँड वाइन शॉपी
सर्वकाही शासनाच्या नियमानुसार...
ही शॉपी तुमच्या मालकीची आहे काय?
- होय, माझ्याच मालकीची आहे.
रहिवाशांची तुमच्या शॉपीबद्दल तक्रार आहे..
- आम्ही सर्व बाबी शासनाच्या नियमानुसार केल्या आहेत.राहिला प्रश्न शाळेचा व नागरिकांचा. त्याबाबत काही लोकांनी नगरसेवकांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली आहे. कारण आमचे दुकान हे शाळेपासून 50 मीटरपेक्षा जास्त अंतरावर म्हणजे 72 मीटर अंतरावर आहे.
तुमच्याकडे परवाना आहे काय?
- होय, बिअर अँड वाइन शॉपीचा परवाना उत्पादन शुल्क कार्यालयानेच दिला आहे. हे दुकान रहिवासी भागात नसून व्यावसायिक भागात आहे. तसेच शासनाच्या नियमानुसार व्यवसाय करण्याचा अधिकार सर्वांना आहे. तसा निर्णय औरंगाबादच्या खंडपीठाने आठच दिवसांपूर्वी दिला आहे. लोक आम्हाला कारण नसताना टार्गेट करत आहेत.
महिलांची कुचंबणा होते
आमचा वॉर्ड स्वच्छ, सुंदर आहे. त्यामुळे आमचा या दारूच्या दुकानाला विरोध आहे.लहान शालेय विद्यार्थी, मुली आणि महिलांची यामुळे कुचंबणा होते. शाळा 50 मीटर अंतरावर असूनही दुकानाला परवानगी दिली गेली. जवळच निराधार बालक आर्शम आहे.
-बाबूराव कवसकर, व्यापारी
महिलांची वर्दळ असणारा भाग
दारूचे दुकान अगदी मध्यभागी आहे. तेथेच शाळा आणी सोन्या-चांदीची तसेच कापडाची दुकाने आहेत. त्यामुळे या ठिकाणी महिलांची सर्वाधिक वर्दळ असते. नियमाचे उल्लंघन करून हे दुकान सुरू केल्याने ते तत्काळ हटवावे.
-जगदीश गायकवाड, ज्येष्ठ नागरिक
दुकानामुळे धक्काच बसला
आमची वसाहत अतिशय चांगली आहे. नगरसेवकही चांगले आहेत. शाळेच्या अगदी जवळ दुकान सुरू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. नागरिकांची, नगरसेवकाची, शाळेची परवानगी न घेता अचानक दुकान सुरू झाले. ते तत्काळ बंद करावे.
-मोहन सोनवणे, व्यापारी
मतदानाची गरजच काय?
आम्ही गेल्या 20 वर्षांपासून या भागात राहतो. चांगली कॉलनी खराब करण्याचा हा प्रकार आहे. बिअर अन् दारू विक्रीचे दुकान अचानक उघडल्याने आम्ही हादरलोच. यामुळे आमच्या भागातील महिला वर्ग कमालीचा अस्वस्थ झाला आहे. मुळात शाळेच्या जवळ दारूचे दुकान सुरूच करता येत नाही हा नियम आहे. त्यामुळे मतदानाची गरजच काय? उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांना याची माहिती नाही काय? या भागात महिलांची दररोज गर्दी असते. कारण येथे सोन्या-चांदीची दुकाने आहेत. सायंकाळी येथे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असते, तसेच जवळच टॉडलर्स ही लहान मुलांची शाळा आहे.
-व्ही.जी.कुलकर्णी, सेवानिवृत्त बँक अधिकारी