आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:बायपासवर सुसाट धावणाऱ्या दहा वाहनांवर रोखली स्पीड गन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वेळ दुपारी एकची. कारचालकाने कासलीवाल मार्व्हलपासून बीड बायपासमार्गे जालन्याच्या दिशेने जाण्यासाठी वळण घेतले. त्याच्याकडे स्कोडा कंपनीची कार होती. गोदावरी पॉइंटच्या अलीकडेच वाहतूक पोलिसांनी स्पीड गन लावली होती. त्यांना लांबूनच ही कार भरधाव येताना दिसली. त्यामुळे पोलिस उपायुक्तांनी तिची गती मोजण्यास सांगितले. कार जवळ येताच ती थांबवण्यात आली. मात्र, चालकाने आपण ताशी ४० कि.मी. वेगानेच कार चालवत होतो, असा दावा केला. पोलिसांनी स्पीड गनवर मोजलेले ५८ कि.मी. चे रेकॉर्डच चालकाच्या हातात दिले. त्यामुळे कारचालक शांत बसला. हा पहिलाच प्रयोग असल्याने त्याला दंड करता समज देऊन सोडण्यात आले. मात्र, त्यानंतर दिवसभरात ....... वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. 
गुरुवारपासून शहरातील अतिमहत्त्वाच्या संवेदनशील मार्गांवर निर्धारित गतीपेक्षा अधिक गतीने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू करण्यात आली. भरधाव वाहनांची गती मोजण्यासाठी शहर वाहतूक पोलिस दलाला अद्ययावत तीन स्पीड गन मिळाल्या. गुरुवारी दुपारी बीड बायपासवर याची चाचपणी करण्यात आली. या वेळी उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक पोलिस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी स्पीड गनचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना पुढील कारवाईसाठी मार्गदर्शन केले. 
 
सहा महिन्यांपूर्वी केली होती मागणी : शहरातील अतिमहत्त्वाच्या तसेच संवेदनशील रस्त्यांवर स्पीड गन लावून वाहतूक पोलिस सामान्य गतीपेक्षा अधिक गतीने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत. सहा महिन्यांपूर्वी या स्पीड लेझर गनची शहर पाेलिसांकडून मागणी करण्यात आली होती. एक स्पीड लेझर गन बीड बायपास, दुसरी जालना रोड, तर उर्वरित एक गन गरजेनुसार वापरण्यात येणार आहे. या वेळी वाहतूक विभागाचे निरीक्षक अविनाश आघाव, सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक भरत काकडे, ए. डी. जहारवाल, एन. ए. शिंगारे, ए. एच. शेख यांची उपस्थिती होती. 
 
बीड बायपास मुख्य लक्ष्य : बीड बायपासवर दररोज साधारण १० ते १५ हजार वाहनांची ये-जा असते. गेल्या काही महिन्यांत येथे भरधाव जड वाहनांमुळे अनेक अपघात झाले. त्यामुळे बीड बायपासवरील जड वाहनांच्या गतीला नियंत्रण लावणे गरजेचे होते. स्पीड गनमुळे ठरवून दिलेल्या गतीपेक्षा अधिक गती असलेल्या वाहनांवर कारवाई होणार असल्याने अपघातांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली. 
 
यामार्गांवर धावतात वेगाने वाहने : बीड बायपाससह पैठण रस्ता, जालना रस्ता, जळगाव रोड, हर्सूल टी पॉइंट, छावणी ते विद्यापीठ या मार्गांवर दुचाकी, चारचाकी वाहने भरधाव चालतात. शिवाय निराला बाजार परिसर, औरंगपुरा, कॅनॉट परिसरातही तरुणाई सुसाट वाहने चालवते. 
 
शहरात पहिल्यांदाच 
-पोलिस विभागात दाखल झालेली स्पीड गन ही लेझर कंपनीची स्पीड गन असून औरंगाबाद शहरामध्ये पहिल्यांदाच वेग नियंत्रणाच्या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पोलिस दलाला मिळालेल्या स्पीड गन अद्ययावत असून मुंबई-पुणे महामार्ग, पुणे-बंगळुरू महामार्गासह देशातील प्रमुख महामार्गांवर अशाच स्पीड गन वापरल्या जातात. सी.डी. शेवगण, सहायक पोलिस आयुक्त  
 
काय आहे स्पीड लेझर गन 
स्पीडगन हा एक रडारचाच प्रकार आहे. रेडिओ ट्रान्समीटर आणि रिसिव्हर या तंत्रज्ञानाच्या वापराने तयार केलेले हे उपकरण असून ते “नॅरो बीम’मध्ये रेडिओ सिग्नल पाठवते. ते दिलेल्या लक्ष्यावर आदळल्यानंतर त्याच गतीने उलट संकेत पाठवते. त्यामुळे वाहनाची अचूक गती समजते. एका स्पीड गनची किंमत सात लाख रुपये असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 
गुरुवारी बीड बायपासवर या स्पीड गनद्वारे वाहनांचा वेग तपासण्यात आला. 
 
अशी काम करते स्पीड गन 
- प्रतितास ३२० कि. मी. वेगाने धावणाऱ्या वाहनाचा वेग मोजू शकते. 
- १५० मीटरवर नंबर प्लेटचे छायाचित्र मिळवू शकते. 
- ५०० मीटरपर्यंत कॅमेरा रेंजद्वारे लक्ष ठेवता येते. 
- दोन किलोमीटरवरील वाहनाचा वेग मोजता येणार. 
- २०० मीटरपर्यंतच्या वाहनाचे बाय आकाराचे छायाचित्र टिपू शकते. 
- छायाचित्रात दिनांक, वेळ आणि वेगही नमूद असेल. 
 
प्रशिक्षणार्थी कर्मचारी : या कारवाईसाठी एक निरीक्षक, तीन उपनिरीक्षक १३ कर्मचाऱ्यांची विशेष नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...