आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्हा बँकेचे ३२ कोटी रुपये वसूल करा, हायकोर्टाची टाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराच्या कायदेशीर चौकशीनंतर आर्थिक नुकसानीस जबाबदार ठरलेल्या तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांकडून जवळपास ३२ कोटी रुपये चार महिन्यांत सक्तीने वसूल करा. या रकमेतून ठेवीदारांचे पैसे परत करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. के.एल.वडणे यांनी शुक्रवारी दिला.

शुक्रवारी सुनावणीदरम्यान बीड मध्यवर्ती सहकारी बँकेतील पैसे कुठे गेले, अशी विचारणा खंडपीठाने केली. त्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी पूर्ण झाली आहे. सहकार कायद्याच्या कलम ८८ नुसार चौकशी करून बँकेस झालेल्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांविरुद्ध चार वसुली प्रमाणपत्रे जारी केली आहेत. पहिल्या पत्रानुसार २ कोटी ५९ लाख ७८०७५, दुसऱ्या पत्रानुसार २२ कोटी ११ लाख १९९१४, तिसऱ्या ४ कोटी १२ लाख ३०६९५, चौथ्या पत्रानुसार २ कोटी ९३ लाख ८७१७८ रुपये वसूल करण्याचे प्रमाणपत्र जारी केले. या वसुली प्रमाणपत्रांची एकूण रक्कम ३१ कोटी ७७ लाख १५ हजार ८६२ होते, असे सरकारपक्षातर्फे खंडपीठास सांगण्यात आले. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. डी. एन. सूर्यवंशी, शासनातर्फे सहायक सरकारी वकील अतुल काळे, बीड जिल्हा बँकेतर्फे अॅड. डी. एन. चौधरी यांनी बाजू मांडली.

बॅंकेच्या तत्कालिन संचालकांमध्ये आमदार अमरसिंह शिवाजीराव पंडीत, दशरथ वनवे, रमेशराव पोकळे, विलास बडगे, दिनकर कदम, रामराव पंढरीनाथ आघाव, रमेश बाबुराव आडसकर, दिलीप जनार्दनराव हंबर्डे, विजयकुमार दत्तात्रय गंडले, अनिल रामराव सोळंके, जालिंदर मल्हारराव पिसाळ, विलास दत्तात्रय सोनवणे, मंगलबाई राजाभाऊ मुंडे, किरण अरूणराव इंगळे, मधुकर पांडुरंगराव ढाकणे, आनंदराव नरहरराव चव्हाण, बदामराव लहुराव पंडीत, मनोहरराव जनार्दनराव डाके, गणपत संपतराव बनसोडे, पांडुरंग लक्ष्मणराव गाडे, अरूण राजाभाऊ इंगळे, शोभा जगदीश काळे, सुभाषचंद्र मिठ्ठूलाल सारडा, धैर्यशील सुंदरराव साळुंके, राजाभाऊ रघुनाथराव मुंडे, रामकृष्ण मानाजी कांदे, रामकृष्ण मारोतराव बांगर, मेघराज बाबुराव देशमुख, मंगला उर्फ प्रेरणा सुंदरराव मोरे, साहेबराव नाथुजी दरेकर, लताबाई वसंतराव सानप, अर्जून उत्तमराव शिंदे, एस. आर. घायाळ, ए. एन. कुलकर्णी आदींचा समावेश आहे. कर्माचारी व अधिकाऱ्यांमध्ये एस. आर. खाडे, जी. डी. किनगे, डी. एफ. चव्हाण, के. यु. आघाव, एस. व्ही. बोगुलवार, बी. आर. लव्हारे, व्ही. एन. सरवदे, बी. जी. फुकटे, एस. पी. जाधव, ए. डी. जाधव, पी. एम. देशमुख, पी. व्ही. पारखी, वाय. एम. बडे. व्ही. एम. धायगुडे, जी. डी. गंडले आदींचा समावेश आहे.
'पणन'ची याचिका
पणन महासंघाच्या बीड शाखेने खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेनुसार महासंघाने बीड जिल्हा बँकेच्या विविध शाखांत १ कोटींच्या ठेवी ठेवल्या होत्या. अनेकदा पत्रव्यवहार करूनही बँकेने पैसे परत केले नाहीत. त्यामुळे ठेवीचे एक कोटी ५१ लाख २० हजार ९४२ रुपये परत मिळावेत अशी मागणी याचिकेत केली होती.
बातम्या आणखी आहेत...