आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलचा झाला बार, परिसर बेजार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको एन-5 भागात ज्योतिर्मय नावाचे कॉम्प्लेक्स असून त्यात खालच्या बाजूला आठ दुकाने आहेत, तर वर फ्लॅट आहेत. मागच्या बाजूला दुर्गामातेचे मंदिर असून तळमजल्यावर शांताई नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलला खेटूनच बिअर शॉपी आहे. हॉटेल चालकाने तळातल्या परिसराचा ताबा घेतला असून पाय पसरले आहेत. मद्यपी येथे बाहेरून दारू प्यायला घेऊन येतात. शेजारच्या बिअर शॉपीतून दारू आणून देण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे वाईन शॉप आणि हॉटेलचालक दोघांचाही फायदा होतो. मात्र, परिसरातील लोकांना याचा फटका बसतो. उत्पादन शुल्क विभागानेही उत्पादनावर पाणी सोडले आहे. असे प्रकार शहरभर घडतात. मात्र, नागरिकांनी तक्रार केल्यामुळे डीबी स्टारने त्याची दखल घेतली आहे.

नागरिक व दुकानदार त्रस्त
शांताई हॉटेलच्या मालकाच्या या कारनाम्यांनी येथील समस्त नागरिक व दुकानदार त्रस्त आहेत. येथे मद्यपी येत असल्याने महिला आमच्या दुकानात सायंकाळी येत नाहीत. दारूड्यांची भांडणेही होत असतात. शिवाय तळातल्या भागात भांडी धुतली जातात. त्यामुळे दुर्गंधीदेखील पसरते.

तक्रार करूनही कारवाई नाही
दुकानदार व नागरिकांनी हॉटेल मालकाला अवैध बार बंद करण्याची विनंती केली, परंतु फरक न पडल्याने त्यांनी सिडको एन-7 पोलिस ठाण्यातही तक्रार दिली. विशेष म्हणजे अनेक वेळा सिडको पोलिसांनीही येथे येऊन भांडणे सोडवली, पण हा अवैध बार त्यांना कसा दिसला नाही हा प्रश्न आहे. हॉटेलमागे मंदिर आहे. तेथील पायर्‍यावर दारूडे बसून गोंधळ घालतात, अशी तक्रार आहे.

डीबी स्टार तपास
वैतागलेल्या नागरिकांनी शेवटी डीबी स्टारकडे कैफियत मांडली. त्यानंतर चमूने सायंकाळी सात वाजता या हॉटेलात जाऊन पाहणी केली. तेव्हा दोन तरुण मुलांनी खाण्याची ऑर्डर दिली. नंतर बिअरची ऑर्डर देताच संजय नावाचा नोकर दोन बाटल्या बिअर घेऊन आला. मालकाने रिकाम्या बाटल्या टेबलाखाली ठेवल्या. कारण विचारल्यावर त्याने, सर हे हॉटेल आहे. येथे प्यायची परवानगी नाही, असे उत्तर दिले. विशेष म्हणजे भिंतीवरही तशा सूचना लिहिलेल्या आहेत.

रात्री आठच्या सुमारास दोन पोलिस आले. त्यांनीही बिअर रिचवली. थोड्या वेळाने आणखी एक पोलिस आला. पोलिस येणार असतील तर हॉटेलचालकाला कळवेल, असेही कळले. धक्कादायक बाब म्हणजे थोड्या वेळाने तेथे पंधरा ते सतरा वयोगटातल्या दोन मुलांनीदेखील दारू पिली.

मुलींची छेड काढतात
माझे डेअरी आयटमचे दुकान आहे. खालीच अवैध बार असल्याने आमच्या दुकानात महिला ग्राहक येण्यास धजावत नाहीत. दारूडे त्यांची छेड काढतात.- संजय जैन, डेअरी चालक

कॅफे बंद करण्याची वेळ
हा अवैध बार माझ्या इंटरनेट कॅफेला खेटूनच आहे. समोरच हॉटेलची घाण मोरी आहे. खरकटे ओलांडून ग्राहकाला कॅफेत यावे लागते. दारूडे त्रास देतात, त्यामुळे मला कॅफे बंद करण्याची वेळ आलीय.-अशोक चित्ते, कॅफेचालक

ही जबाबदारी उत्पादनशुल्कची
परवाना देण्यापासून ते विक्रीपर्यंत सर्वच जबाबदारी उत्पादनशुल्क विभागाची असते. त्यामुळे याबाबत कारवाईची जबाबदारीसुद्धा त्यांचीच आहे. यात त्या विभागाने मदत मागितली तरच आम्ही हस्तक्षेप करू शकतो.-शिवा ठाकरे,पोलिस निरीक्षक, सिडको एन-7

मॅनेजरशी झालेला हा संवाद..
तुम्ही मालक आहात का?
-म्हणजे शिंदे साहेबांचे हॉटेल आहे. मी त्यांचा नातेवाईक आहे.

तुमचे नाव काय?
बाळासाहेब तुपे.

हे हॉटेल आहे की बार?
-साहेब, हे हॉटेल आहे बार नाही. तशी परवानगी नाही.

मग दारू कुठून आणता?
- बाजूला बिअर शॉपी आहे. तेथून आणून देतो, पण लपून.. इथे परवानगी नाही. टेबलवर बाटली जास्त वेळ ठेवू देत नाही.

परवानगी नाही तर पोलिस कारवाई करीत नाहीत का?
-येतात कधी कधी.म्हणूनच आमचा येथे येणार्‍या सर्व ग्राहकांना टेबलावर बाटली ठेवू नका, असा आग्रह असतो.

थेट सवाल : दिलीप शिंदे , मालक शांताई रेस्टॉरंट
शांताई तुमचेच हॉटेल आहे काय?
-होय माझेच आहे, पण मी सध्या ते भाड्याने दिले आहे.
त्याला बिअरचे परमिट आहे काय?
-नाही. ते फक्त हॉटेल आहे.
मग तेथे लोक दारू किंवा बिअर कसे पितात.
-नाही माझ्या महितीप्रमाणे असे काहीच होत नाही. त्या अपार्टमेंटमधील काही दुकानदार बदमाश आहेत. त्यांचे आणि माझे जुने भांडण आहे. त्यामुळेच ते लोक नेहमी तक्रारी करतात. तुम्ही एकदा सर्वेक्षण करा, माझ्याविषयी कुणाचीही तक्रार नाही.
बाजूची बिअर शॉपी कुणाची आहे?
-ती माझ्याच मालकीची आहे, पण त्यामुळेही काही त्रास नाही. महिलांना तर मुळीच नाही. तेथील काही लोकांनी मला बदनाम करण्याचा विडाच उचललाय. संपूर्ण बिलि्डगमध्ये दहा कुटुंबे राहतात. त्यांना विचारल्यास तेही सांगतील की त्यांना काहीही त्रास नाही.
तुमच्या हॉटेलसमोर दारूडे धिंगाणा घालतात त्यामुळे तेथील लोक तसेच महिलांना त्रास होतो..
- मी दहा वर्षांपासून हे हॉटेल चालवतोय. या तक्रारी आता गेल्या दोन वर्षांपासून आहेत. कारण तेथील काही व्यापारी माझा हेवा करतात. तेच माझ्या रिकाम्या तक्रारी करतात.
मागे मंदिरात दारूडे जाऊन बसतात.
- मंदिराचे लोकही खोटे बोलतात.
आमच्याकडे तुमच्या हॉटेलचे स्टिंग आहे. तेथे दारू पिताना लोकांना आम्ही टिपले आहे.
-आता मी हे हॉटेल दुसर्‍याला चालवायला दिले आहे. तरीही मी पुन्हा एकदा सर्व गोष्टी माझ्या परीने तपासतो. तुम्ही स्वत: एकदा येऊन बघा. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतो.

काय म्हणतात रहिवासी
दारूड्यांचा मंदिराला त्रास
येथील मंदिरात भाविक रात्री दर्शनाला येतात तेव्हा या अवैध बारमधील दारूडे मंदिराच्या पायर्‍यांवर बसलेले असतात. त्यामुळे भाविकांना त्रास होतो. त्यामुळे हैराण आहोत.- हनुमानसिंग परदेशी, संस्थापक अध्यक्ष, दुर्गामाता मंदिर

दुकान बसण्याची वेळ
मी 4 वर्षांपासून या बारमुळे हैराण आहे. माझे मेडिकल दुकान बसण्याची वेळ आली आहे. खाली बार असल्याने महिला औषधी घेण्यासाठी माझ्या दुकानात येतच नाहीत.-सचिन हिरावार, मेडिकल दुकानदार

विनवण्या करून थकलो
माझे दुकान वर असून खाली हा अवैध बार आहे. हॉटेलमालक शिंदे यांना आम्ही खूप वेळा विनंती केली, खूप विनवण्या केल्या, पण ते म्हणतात, कुठे तक्रार करायची ते सांगा मीपण सोबत येतो.- अनिल कोठारी, सुपर शॉपीचे मालक

दारूड्यांचा नेहमीच हैदोस
माझे याच ठिकाणी पोळी-भाजी केंद्र आहे. रात्री दारूड्यांचा हैदोस असतो. ते आम्हाला त्रास देतात. ग्राहकांना येऊ देत नाहीत. महिलांची छेड काढतात.- सुनील पाटील, मालक, पोळी-भाजी केंद्र