औरंगाबाद - राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केल्यानंतर औरंगाबाद महापालिका शहरातील १२ जलतरण तलाव बंद करण्याच्या निर्णयावर होळीच्या आधी अंमलबजावणी करणार आहे. याबाबत महापालिका प्रशासन येत्या दोन-तीन दिवसांत आदेश जारी करणार आहे.
राज्यातील दुष्काळी स्थिती पाण्याची अभूतपूर्व टंचाई या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील सर्व महापालिकांना त्यांच्या हद्दीतील जलतरण तलाव जून - जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे अादेश दिले होते. होळीसाठी रेन डान्ससाठी टँकर देऊ नका, असेही स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तसेच थीम पार्क्सना पाणी देण्यापेक्षा पिण्यासाठीच पाणी वापरले जावे यासाठी हे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. मान्सूनपर्यंत हे आदेश जारी राहणार आहेत. औरंगाबाद मनपाला महाजन यांचे हे आदेश प्राप्त झाले असून त्यावर कार्यवाही सुरू झाली आहे. मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया म्हणाले की, आदेशांचा अभ्यास करून लगेच निर्णय घेतला जाईल.
औरंगाबाद शहरात मनपाचा सिद्धार्थ उद्यानातील जलतरण तलाव सध्य सुरू. राकाज लाइफस्टाइल क्लब बंद आल्याने तेथील जलतरण तलावही बंदच आहे. याशिवाय विद्यापीठाचा जलतरण तलावही दुरुस्तीसाठी बंद आहे. शहरातील इतर जलतरण तलाव खासगी संस्था हाॅटेलांचे आहेत. यातील काही तलावांना मनपा, एमआयडीसी खासगी पुरवठादारांकडून पाण्याचा पुरवठा केला जातो. फक्त मनपाचाच पाणीपुरवठा असणारे तलाव बंद करणार की सगळे, असे विचारले असता शहर अभियंता एस. डी. पानझडे म्हणाले की, पाण्याची स्थिती चिंताजनक आहे. पिण्यासाठी पाणी हाच प्राधान्याचा विषय असल्याने पाण्याचा थेंबही वाया जाणार नाही याची खबरदारी घेणार आहोत. त्यामुळे शहरातील सगळे जलतरण तलाव बंद करण्याबाबत होळीच्या आधीच निर्णय होणार आहे.