आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिकारी जात नाहीत, व्यवस्थाही गंभीर नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भिक्षा प्रतिबंधक कायदा १९५९ नुसार भीक मागणे गुन्हा आहे. एखादी व्यक्ती भीक मागताना आढळली तर या कायद्यानुसार पोलिसांनी त्यास पकडून न्यायालयासमोर हजर करावे. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने संबंधित व्यक्तीचे पुनर्वसन करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. मात्र, या कायद्याचाच पोलिसांना विसर पडला आहे. परदेशी पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या पर्यटननगरीमध्येच महत्त्वाच्या ठिकाणी तब्बल सव्वाशे भिकारी आहेत. यापैकी एकही भिकारी पोलिसांना कसा दिसत नाही? मनपाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या रात्रनिवारागृहांमध्ये या लोकांची निवासाची चांगली सोय होऊ शकते. मात्र, असे असतानाही भिकारी स्वत:हून तिथे जायला तयार नाहीत अन् आपली व्यवस्थाही त्यांना तेथून हलवायला तयार नाही.
भिक्षा प्रतिबंधक कायद्यानुसार भिकाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशाने भिक्षेकरीगृहामध्ये पाठवावे लागते. तेथे त्यांच्यासाठी कौशल्य विकासाची शिबिरे घेऊन त्यांना स्वावलंबी बनवावे, अशी तरतूद या कायद्यात आहे. मात्र, औरंगाबाद शहरात एकही भिक्षेकरीगृह नाही. किमान मनपाच्या रात्रनिवारागृहामध्ये तरी त्यांचे पुनर्वसन होऊ शकते. रात्रनिवारागृहे आणि भिक्षा प्रतिबंधक कायद्यातील भिक्षेकरीगृह यांच्यात साम्य आहे. त्यामुळे भिक्षेकरीगृह नसले तरीही मनपाच्या निवारागृहांचा आधार घेऊन शहरातील भिकाऱ्यांचे पुनर्वसन होऊ शकते.

दिवसभरकाम, रात्री निवारागृहात
सध्या शहरातील सहा रात्रनिवारागृहांमध्ये १६२ जण आहेत. बहुतांश जण दिवसभर हॉटेल, दुकान, मोंढ्यात राेजंदारीने काम करतात रात्री मुक्कामासाठी निवारागृहात येतात. भिकाऱ्यांचेही या पद्धतीने पुनर्वसन करता येऊ शकते. निवारागृहात असलेल्या व्यक्तींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची योजना प्रस्तावित आहे. जर रात्रनिवारागृहामध्ये येण्यास भाग पाडून त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले तर खऱ्या अर्थाने ते स्वावलंबीदेखील बनू शकतील.

जगभरातील पर्यटकांचे भिकाऱ्यांकडून स्वागत
वेरूळ, अजिंठ्यासारखी जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे औरंगाबादमध्ये आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. जेव्हा पर्यटक रेल्वे अथवा बसने शहरात येतात, तेव्हा त्यांचे स्वागत भिकाऱ्यांकडूनच होते. त्यांना गराडा घातला जातो. काही टवाळखोर अंगाला हात लावून पैसे मागतात.

स्वच्छभारत मिशनला यामुळे बसतो फटका
जेलोक रस्त्यावर राहतात, ते लोक नैसर्गिक विधींसाठी कुठे जात असतील? जिथे राहतात, तिथेच त्यांना आडोसा सापडतो. यामुळे परिसरही अस्वच्छ होतो. १०० टक्के कुटुंबांकडे शौचालये असली तरीही ते शहर पाणंदमुक्त झाले, असे म्हणता येणार नाही. कारण उघड्यावर राहणारे लोक उघड्यावरच बसतात. अंघोळ, जेवणही तेथेच उरकले जाते.

रस्त्यावर भीक किंवा कुठल्याही वस्तू देऊ नका
रस्त्यावर कुणी असाहाय्य चेहरा समोर करून भीक मागतो, कुणी पाठीवर झोळीमध्ये लेकरू घेऊन रस्तोरस्ती भीक मागत फिरतो, तेव्हा भावनिक होऊन आपण त्यांना भिकेपोटी पैसे किंवा काही वस्तू देतो. ही झाली अल्पकालीन संवेदनशीलता. मात्र, याच संवेदनशीलतेला आपण दीर्घकालीन संवेदशनशीलतेत रूपांतरित करू शकलो तर? त्यासाठी एकच करा. रस्त्यावर भीक देण्यापेक्षा रात्रनिवारागृहांमध्ये जाऊ द्या. आपण रस्त्यावर देण्याची सवय लावली आहे आणि त्यांच्या अंगीही ही सवय भिनली आहे. हीच देण्याची सवय जर रात्रनिवारागृहांमध्ये लावली तर रस्त्यावरील भिकारी स्वत:हून रात्रनिवारागृहांकडे जातील. त्यांना एकप्रकारे या निवारागृहांचे आकर्षण वाढेल. रस्त्यावर भीक मागणे सोडून ते रात्रनिवारागृहांमध्ये गेले तर खऱ्या अर्थाने त्यांचे पुनर्वसन होईल. शहरातील बकालीही कमी होईल. शिवाय भिकाऱ्यांचे रॅकेट चालवणारेही दुकान गुंडाळतील.

निवाराघर तरीही बेघर : अंतिम भाग
मोठ्यांच्या सोबतीला लहान मुलेही
काहीभिकाऱ्यांसोबत लहान मुलेही अाहेत. मनपाने सर्वेक्षण केले त्या वेळी २१ मुले आढळून आली होती. त्यांना ना शिक्षण मिळते ना मूलभूत हक्क. हेच जर रात्रनिवारागृहांमध्ये गेले, त्यांचे आई-वडील तेथे काम करू लागले तर अशा मुलांच्या शिक्षणाचीही सोय होऊ शकेल.
पर्यटननगरी असलेल्या औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी असे भिकारी बसतात. पहिले छायाचित्र रेल्वेस्थानकाबाहेरचे, तर दुसरे क्रांती चौक उड्डाणपुलाखालचे. तेथील परिसर असा घाण केला जातो.

मनपाचे सहकार्य घेणार
महानगरपालिका आयुक्तांशी आमचे या विषयावर बोलणे झाले आहे. कायद्याने खरे तर भीक मागणे हा गुन्हाच आहे. लवकरच शहरातील सर्व भिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महानगरपालिकेच्या सहकार्याने कार्यवाही करू. याबाबतीत दोन्ही विभाग एकत्र येऊन काम करतील. -संदीप आटोळे, पोलिसउपायुक्त

...तर निवारागृह चालवू
समाजातीलदानशूरांनीरस्त्यावरची मदत थांबवून रात्रनिवारागृहांमध्ये जाऊन मदत केली पाहिजे. मनपाने जर आर्य समाज संघटनेला रात्रनिवारागृह चालविण्यासाठी जागा दिली तर आम्ही चांगल्या पद्धतीने चालवू शकू. मनपाचा एकही रुपया घेता समाजातील दात्यांच्या जिवावर निवारागृह चालवून दाखवू. -डॉ. लक्ष्मण माने, आर्यसमाज संघटना
बातम्या आणखी आहेत...