वाळूज- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बजाजनगरातील बंगाली असोसिएशनतर्फे आयोजित चार दिवसीय दुर्गापूजा महोत्सवास सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला. सायंकाळच्या सुमारास गणपती, कार्तिक, लक्ष्मी, सरस्वती व महिषासुराचा वध करणा-या दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 3 ऑक्टोबर रोजी सिंदूर पूजेने महोत्सवाची सांगता होणार आहे.
येथील अल्फोन्सा शाळेच्या बाजूला दुर्गापूजा महोत्सवाच्या निमित्ताने भव्य मंडप टाकण्यात आला आहे. महोत्सवाच्या प्रारंभी सोमवारी सायंकाळच्या सुमारास गणपती, कार्तिक, लक्ष्मी, सरस्वती व महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सायंकाळी खास दुर्गा पूजेसाठी बंगालहून बोलावलेल्या बच्चू चक्रवर्ती या पुरोहितांच्या मंत्रोच्चारामध्ये महापूजा व होम आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. या निमित्ताने केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे परिसर उजळून गेला आहे. सप्तमीनिमित्त मंगळवारी सकाळी 8 वाजेपासून पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. अष्टमीनिमित्त बुधवारी सकाळी 8 ते 12 वाजेच्या दरम्यान शोनदी पूजन, बलिदान, होमहवन, सायंकाळी चारच्या सुमारास 108 दिवे लावणे, 108 कमळांच्या फुलांचे पूजन, तर नवमीनिमित्त गुरुवारी पूजा व विविध धार्मिक विधी केले जाणार आहेत. शुक्रवारी 3 ऑक्टोबरला कायगाव येथील गोदावरी नदीच्या पाण्यात मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. मिठाई वाटप व सिंदूर खेळाने महोत्सवाची सांगता होणार आहे. बंगाली असोसिएशनचे अध्यक्ष एन. दत्ता, एम. रॉय, आर. संत्रा, जे. नित्रा, संघटनेचे सचिव एल. सी. दास, यू. कोयल, डी. घोस, डी. मंडल, एम. पात्रा
आदी असोसिएशनचे पदाधिकारी कार्यक्रमासाठी पुढाकार घेत आहेत.