आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"बेटी बचाओ'चे शालेय दशेतच शिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात पावसाअभावी पडणारा दुष्काळ नवा नाही. तसेच दिवसेंदिवस मुलींच्या जन्मदरात होणारी घटदेखील मोठा प्रश्न आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या या समस्या लक्षात घेता शालेय दशेतच विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्याची आणि परिस्थितीची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी शहरातील मुकुल मंदिर शाळेने आगळावेगळा प्रयोग राबविला आहे. "बेटी बचाओ और पाणी बचाओ', पर्यावरण वाचवा, असा संदेश देणारे पोस्टर आणि चित्रांनी शाळेचा परिसर सजवण्यात आला आहे. या माध्यमातून सर्वांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न शाळेने केला आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यात पुरेसा पाऊस नाही. शेतकऱ्यांचेदेखील हाल आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली तर पिण्याच्या पाण्यासाठीदेखील वाद होतील. त्यामुळे उद्याचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना याची जाणीव होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत शाळेने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी सांगितले. त्यात पाणी आणि बेटी बचाओ असे विषय देण्यात आले. पाणी वाचवा, बेटी बचाओ, असे विषय दिल्याचे मुख्याध्यापक सुरेश परदेशी यांनी सांगितले. आपण आज कितीही सुधारलो तरीही काही घरांत आजही मुलगा-मुलगी भेद होतो. जन्माला येण्यापूर्वीच मुलीची गर्भातच हत्या करण्यात येते. या सर्व बाबी घातक ठरू शकतात. त्यामुळे हे विषय हाती घेण्यात आले. विद्यार्थ्यांनीदेखील यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शाळेच्या परिसरात ही सर्व चित्रे आणि पोस्टर्स लावण्यात आली आहेत.

समान भावना, जबाबदारीची जाणीव
विद्यार्थ्यांमध्ये पाणी आणि पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. शाळेत मुलांना मूल्यांची आणि संस्काराची शिकवण दिली, तर मुले घरातही याबद्दल सांगत असतात. तसेच त्याप्रमाणे ते वर्तन करतात. त्यासाठी योग्य वेळी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. या उपक्रमात सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. - सुरेश परदेशी, मुख्याध्यापक.