आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhagat Singh, Rajguru, Sukhdev, Latest News In Divya Marathi

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे पणतू उद्या शहरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मातृभूमी स्वयंसेवी संस्थेतर्फे शहीद दिनानिमित्त 22, 23 मार्चला सायंकाळी चार ते नऊ या वेळेत गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुल येथे व्याख्याने, देशभक्तिपर गीतांचा जल्लोष आणि लष्कराच्या वतीने ‘नो युवर आर्मी’ या शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येईल. या वेळी शहीद भगतसिंग यांचे पणतू अभितेजसिंग संधू, शहीद राजगुरू यांचे पणतू विलास राजगुरू, शहीद सुखदेव यांचे पणतू भारतभूषण थापर यांची उपस्थिती असेल, अशी माहिती माहिती मुख्य संयोजक कर्नल समीर राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सेवानिवृत्त एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक यांच्या हस्ते शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. मेजर जनरल दीपक धांडा, ब्रिगेडियर मनोजकुमार, ब्रिगेडियर दशरथ, 26/11 हल्ल्यावेळी शौर्य गाजविलेले आणि शौर्यपदक विजेते मेजर ए. के. सिंग, शहाजी भोसले, अंधर्शद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, विधिज्ञ उज्‍जवल निकम, वक्ते नितीन बानगुडे पाटील, अविनाश पाटील, अनिल बोकील, यांची उपस्थिती राहणार आहे.
एनसीसीच्या हवाई विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला एअरो मॉडेलिंग शो सादर करण्यात येईल. यात विविध प्रकारची विमाने रिमोट कंट्रोलद्वारे उडवून दाखविली जाणार आहे. प्रत्यक्ष गन हातात घेण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता येईल. मशीनगन, पिस्टल, हँडग्रेनेड, स्टेनगन, बोटीमध्ये आयएनएस, रिमोट कंट्रोल गायडर, अरायझिंगस्टार आदी शस्त्रास्त्र प्रदर्शनात ठेवणार आहे. अँड. निकम यांचे राष्ट्रीय चारित्र्य, शहीद भगतसिंग जीवनकार्यावर अविनाश पाटील, ‘महिला सबलीकरण आणि सामाजिक दायित्व’ या विषयावर अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, बानगुडे पाटील, डॉ. हमीद दाभोलकर, शहाजी भोसले आदींचे व्याख्यान होणार आहे. लहान मुलांची देशभक्तिपर नाटिका होईल. एअर चीफ मार्शल नाईक मार्गदर्शन करणार आहेत.
बॉलीवूडमधील आघाडीचे गायक स्वरूप भालवणकर तसेच स्थानिक कलावंत दीपा काळे चक्रवर्ती, संगीता भावसार, गौरव पवार, रवी खोमणे, राजेश भावसार, लक्ष्मीकांत काळे दोन्ही दिवस गीते सादर करतील. लष्करामध्ये भरती होण्यासंदर्भात माहिती दिली जाणार आहे. पोलिसांच्या बॉम्बशोधक पथक प्रात्यक्षिक सादर करणार आहे, तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर्नल राऊत, उपक्रमाचे उपाध्यक्ष मानसिंग पवार, मातृभूमी ट्रस्टचे अध्यक्ष जसवंतसिंग राजपूत, संयोजक झवेरिया मोतीवाला यांनी केले आहे.