आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साम्यवादाच्या बुरख्याखाली चीनमध्ये भांडवलशाही, भाई वैद्य यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सध्या चीनमध्ये साम्यवादाच्या बुरख्याखाली भांडवलशाही सुरू असून भारतात धनदांडग्यानी लोकशाहीचा प्राण घेण्याचे काम सुरू केले आहे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बापू काळदाते, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुधा काळदाते यांच्या स्मृतीनिमित्त रविवारी ‘लोकशाही मूल्य: आघात आणि आव्हाने’ या विषयावर डॉ. यशवंत सुमंत, डॉ. वंदना भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात वैद्य म्हणाले की, चीनची वाटचाल भांडवलशाहीकडे सुरू झाली आहे. अर्थात त्यासाठी साम्यवादाचाच वापर होत आहे. भारतात 103 लोकांकडे देशातील एकूण संपत्तीपैकी 25 टक्‍के संपत्ती आहे. भारतीयांची मानसिकताही बदललेली नाही. सरंजामशाहीप्रमाणे कोणी तरी येईल आणि देश सुधारेल, असे त्यांना वाटते.

सध्याची राजकीय व्यवस्था पाहता राजकारणाच्या प्रगल्भतेचे आकलन लोकशाही टिकवण्यासाठी गरजेचे असल्याचे मत डॉ. सुमंत यांनी व्यक्त केले. आज मनी, मसल पॉवर महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे राजकीय दुर्लक्ष करणे घातक ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविक सुभाष लोमटे यांनी केले. रणजित खंदारे यांनी सूत्रसंचालन केले. अण्णासाहेब खंदारे यांनी आभार मानले.

सांस्कृतिक बधिरता धोकादायक
समाजाची हरवत चाललेली संवेदनशीलता तसेच सांस्कृतिक बधिरता धोकादायक असल्याचे मत डॉ. भागवत यांनी व्यक्त केले. अमेरिकेत बलात्कारित महिलेने गर्भ वाढवायचा की नाही यावर वाद सुरू आहे. तर जातीबाह्य लग्न केल्यामुळे नाशिकमध्ये नऊ महिन्याचा गर्भ वाढवणार्‍या महिलेचा खून तिचा बाप करतो, अशी स्थिती असल्याचे डॉ. सुमंत यांनी सांगितले.