आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष: ...हीच तर आहे खरी ईश्वरसेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरगरीब आणि गरजूंची सेवा हीच खरी ईश्वरसेवा, हे ब्रीद उल्कानगरीतील महिलांचे जागृत भजनी मंडळ तंतोतंत आचरणात आणत आहे. गेल्या 22 वर्षांपासून हे मंडळ नवरात्रीनिमित्त भजने सादर करून एकीकडे आपली प्राचीन संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतेय, तर दुसरीकडे यातून मिळणारी मानधनाची रक्कम वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि इतर गरजवंतांना देऊन समाजाप्रति असणारे ऋण फेडत आहे. सोबतच भजनातून बचतीचे महत्त्व, महिलांचा सन्मान आणि स्त्री भ्रूणहत्या थांबवणे, यासारखे सामाजिक संदेश देण्यात हे महिला मंडळ खारीचा वाटा उचलत आहे.

नवरात्राची चाहूल लागताच जागृती भजनी मंडळातील सदस्य भजनाची तयारी सुरू करतात. टाळांच्या गजरात भजनांचा पुन्हा एकदा सराव केला जातो. पहिल्या माळेपासून निमंत्रित घरात एकाहून एक सरस भजने सादर करतात. 22 वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. 1992 मध्ये समविचारी महिलांनी एकत्र येऊन संस्कृती जपण्याच्या हेतूने काहीतरी केले पाहिजे हा विचार केला. त्यातूनच या जागृत भजनी मंडळाची स्थापना झाली.

पूर्वी मोफत, आता नाममात्र मानधन
मंडळातील सर्व सदस्य मध्यमवर्गीय आहेत. मंडळाच्या अध्यक्षा विद्या जोशी या र्शीविद्या बालक मंदिरात शिक्षिका आहेत, तर उर्वरित सर्व महिला गृहिणी आहेत. सुरुवातीला हे मंडळ मोफत भजने सादर करत होते, पण मोफत दिले तर त्याची किंमत राहत नाही. हे लक्षात आल्यावर त्यांनी नाममात्र मानधन घेण्यास सुरुवात केली. मात्र, मानधन घेण्यामागे आणखी एक उद्देश होता.

गरजूंना मदतीचा हात
भजने सादर करून प्राचीन संस्कृतीचे जतन करण्यास हातभार लावण्याचे समाधान होते, तर दुसरीकडे समाजातील गरजूंचे हालही त्यांना व्यथित करत होते. देवाने आपल्याला भरपूर दिले आहे, पण अनेक लोकांना दोन वेळचे अन्न, अंग झाकायला कपडेही नशिबी नाहीत, असा विचार त्या करत होत्या. यातूनच भजनातून मिळणार्‍या मानधनाचा गरजूंसाठी वापर करण्याचे त्यांनी ठरवले. एका भजनाच्या कार्यक्रमाचे त्यांना 501 रुपये मानधन मिळते. कधी-कधी दिवसात दोन कार्यक्रमही होतात.

नवरात्रात 5 ते 6 हजार रुपये जमा होतात. ही रक्कम हे मंडळ मातोर्शी वृद्धार्शम, साकार बालगृह, गजानन मंदिरात गरजूंना अन्नदान आदी कामासाठी देत आहे. भजनाला जाण्यासाठी लागणारा रिक्षाचा खर्चही त्या स्वत: करतात. मानधनाचा एक रुपयाही स्वत:साठी खर्च करायचा नाही, असे त्यांनी ठरवले आहे. या सदस्यांचे वय 65 च्या पुढे असल्याने आता चालणे शक्य होत नाही. यामुळे यंदा प्रत्येकीने 50 रुपये जमा करून एक मिनीबस लावली आहे. ही बस त्यांना घरून घेऊन जाते आणि पुन्हा आणून सोडते.


हे आमचे सामाजिक दायित्व
या समाजाने आम्हाला भरभरून दिले आहे. आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून आम्ही मानधनाची रक्कम गरजूंना देतोय. आम्ही खूप काही वेगळे काम करत नसून हा आमचा समाजासाठी खारीचा वाटा आहे. -विद्या जोशी, अध्यक्ष, जागृत भजनी मंडळ, उल्कानगरी

चित्रपटाच्या चाली टाळतात
हे मंडळ चित्रपटाच्या गाण्यांच्या चालीवर भजने सादर करत नाही. प्रत्येक भजनाला त्या पारंपरिक चाल लावतात. प्रत्येक कार्यक्रम दोन ते अडीच तास चालतो. मंडळाने भजनाच्या स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसेही मिळवली आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या भजनातून स्त्री भ्रूणहत्या थांबवणे, प्रदूषण बचाओ, बचत, लहान कुटुंब सुखी कुटुंब, आरोग्याच्या चांगल्या सवयी, स्त्री साक्षरता यासारख्या विषयांवर प्रबोधन करतात.