आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhalchandra Kongo Speak About Marathwada Development, News In Marathi

शेती हेच मराठवाड्याचे विकास मॉडेल : डॉ. भालचंद्र कांगो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - 1970 च्या दशकातील औद्योगिकीकरणाचे वारे ओसरले असून शेती हेच मराठवाड्याच्या विकासाचे मॉडेल आहे. त्यात शेतीच्या विकासासाठी जायकवाडीत पाणी हवे. जायकवाडीत पाणी नाही, तर मराठवाड्याचा विकास होणार नाही, अशी भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत माकप नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी व्यक्त केले आहे. पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त ‘जागर गोविंदभाईंच्या आठवणींचा’ या कार्यक्रमांतर्गत ‘मराठवाड्याचा विकास’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गुरुवारी स्वामी रामानंद तीर्थ विकास व संशोधन संस्थेत हा कार्यक्रम झाला.
कांगो म्हणाले की, 1974 च्या काळात औद्योगिकीकरण हे विकासाचे मॉडेल होते. मात्र, ते आता राहिलेले नाही. रोजगार मिळेल या आशेने त्या काळात उद्योगांना सर्वांनी जमिनी, सरकारने सवलती दिल्या. मात्र, आता केवळ औद्योगिकीकरणातून विकास शक्य नाही. मानव विकासाच्या निर्देशांकानुसार मराठवाड्याचा विकास झाला का, हेदेखील तपासले पाहिजे.

उद्योगांची पाणी कपात कशासाठी? :
एकीकडे डीएमआयसीसाठी 800 कोटी रुपये खर्च करून पाण्याची योजना राबवण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भविष्यातल्या उद्योगासाठी 800 कोटी, मात्र आहे त्या उद्योगांची पाणी कपात कशाला करता? आहेत ते उद्योग टिकवले पाहिजेत, असे मतही कांगो यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप सु. भी. वर्‍हाडे यांनी केला. या वेळी ना. भी. देशपांडे, सुरेश कुलकर्णी, प्रदीप पुरंदरे, निशिकांत भालेराव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जायकवाडीच्या पाण्यासाठी आवाज उठवण्याची गरज
मराठवाड्यात शेतीचा विकास झाला नाही. आज शेती परवडत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेती विकत आहेत. शेतीसाठी लागणारे पाणी त्यांना मिळालेच पाहिजे. आज जायकवाडीत पाणी सोडले जात नाही. मराठवाड्यातल्या जनतेला हे समजून सांगितले पाहिजे की, जायकवाडीत पाणी आणण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि जनशक्तीच्या माध्यमातून आवाज उठवणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.