आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भापकर मार्गाचे पुन्हा नामांतर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी निधी देणार्‍या तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे नाव त्या मार्गाला देण्याचा निर्णय आता फिरवण्यात आला आहे. मनपाच्या 19 नोव्हेंबरला होणार्‍या सर्वसाधारण सभेत भापकर मार्गाचे बाळासाहेब ठाकरे मार्ग असे नामांतर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. गंमत म्हणजे भापकरांचे नाव देण्यासाठी जे सूचक होते तेच सूचक याही प्रस्तावाला आहेत.

भापकरांचे नाव आणि खैरेंचा विरोध : गतवर्षी डिसेंबर महिन्यात सर्वसाधारण सभेने या रस्त्याचे डॉ. भापकर मार्ग असे नाव देण्याचा प्रस्ताव मान्य केला. नंतर डॉ. भापकर बदलून गेले आणि या रस्त्याचे काम रेंगाळले. या रस्त्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याने खासदार खैरे यांनी तर या मार्गाला डॉ. भापकरांचे नाव बिलकूल देऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली.

दोनदा नाव बदलले
मनपाच्या 19 नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन या मार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग असे नाव देण्याचा प्रस्ताव येणार आहे. सभागृह नेते सुशील खेडकर, रेणुकादास वैद्य, गजानन बारवाल, विकास जैन, गिरीजाराम हाळनोर व वीरभद्र गादगे हे या प्रस्तावाचे सूचक आहेत, तर सूर्यकांत जायभाये, हुशारसिंग चव्हाण व विजय वाघचौरे अनुमोदक आहेत. गंमत म्हणजे भापकरांचे नाव देण्याच्या प्रस्तावालाही वैद्य, जैन, बारवाल, हाळनोर व गादगे हेच सूचक होते.