आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी "कडा'वर भारतीय किसान संघाच्या 300 शेतक-यांनी मांडला ठिय्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पिण्यासाठी आणि पिके जगवण्यासाठी लोणी सावंगी बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी जालना, परभणी, बीड जिल्ह्यांतील शेकडो शेतक-यांनी शुक्रवारी दुपारी 12 ते 3.30 वाजेदरम्यान कडा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. आमच्या मागण्या पूर्ण करा, नाही तर खुर्च्या खाली करा, पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, बंधा-यात पाणी सोडलेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

50 टक्क्यांपेक्षाही पर्जन्यमान कमी झाल्याने बंधा-यात पाणीच आले नाही. मान्सूनमध्येच बंधारा कोरडा पडला. त्यामुळे 23 गावांतील महिला-पुरुषांना घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जनावरांसाठीही पाणी नाही. उभी पिके धोक्यात आली आहेत. पाणी दिले गेले नाही तर उत्पादनात मोठी घट येईल. केलेला खर्चही निघणार नाही याचा विचार करून शासनाने किमान सात ते दहा टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश कडा प्रशासनास द्यावेत, यासाठी वेळोवेळी मागणी करण्यात आली. पण शासन दखल घेत नसल्याने बीड जिल्ह्यातील सादोळा, आबूजवाडी, जायकोचीवाडी, रामनगर, पुरुषोत्तमपुरी, सुलतानपूर, वाघोरा, काळेगावथडी, डुब्बाथडी, हिवरा, गव्हाणथडी, किट्टी आडगाव, रिधोरी, परभणी जिल्ह्यातील नाथ्रा, जालना जिल्ह्यातील सावंगी, कुंभारवाडी, गोळेगाव, संकनपुरी, चांगतपुरी, गुंज, सावरगाव, धामणगाव, भादली यासह 23 गावांतील सुमारे 300 शेतकऱ्यांनी भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली कडा कार्यालयासमोर साडेतीन तास ठिय्या आंदोलन केले. माजलगावचे आमदार आर. टी. देशमुख, भारतीय किसान संघाचे महामंत्री बळीराम सोळंके यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक एन. व्ही. शिंदे यांच्याशी चर्चा केली. शिंदे यांनी शासनाकडे मागणीचा अहवाल पाठवून आठवडाभरात लोणी सावंगी बंधाऱ्यात पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचा फोन
पिके जगवण्यासाठी बंधाऱ्यात पाणी हवे असल्याचा अहवाल सोमवारी शासनाला पाठवा, मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे साकडे घालतो, असे आमदार देशमुख यांनी शिंदे यांना सांगितले. याच वेळी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी देशमुख यांच्या मोबाइलवर संपर्क साधून प्रशासक शिंदे यांच्याशी बोलून परिस्थिती जाणून घेत काही सूचना केल्या.