आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी होणार आमचा डीपी रोड ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोठमोठ्या इमारती, आलिशान वसाहती, ज्यात किमान सात ते आठ कॉलन्यांची १० हजारांची लोकवस्ती असलेला भाग... पण या भागात जा-ये करायला धड रस्ताही नाही. या रस्त्यावरून जाताना एखाद्या खेड्यात गेल्यासारखे वाटते. भावसिंगपुरा परिसरात येणारा हा भाग. खड्डे, उखडलेली खडी आणि माती यामुळे या सर्व वसाहतींना जोडणारा मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. गेल्या चार वर्षांत तर या चिखलमय रस्त्याची कधी दुरुस्ती झाली नाही की कधी पॅचवर्क झाले नाही. याबाबत नगरसेवक आणि अभियंत्यांचे दावे परस्परविरोधी आहेत.
भावसिंगपुरा परिसरातील भावसिंगपुरा ते चिनार गार्डन, शनी मंदिर ते जुना भावसिंगपुरा असे दोन मुख्य रस्ते आहेत. याअंतर्गत भावसिंगपुरा, पेठेनगर, नंदनवन कॉलनी, भुजबळनगर, राजधानीनगर आदी वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये थोडेथोडकी नव्हे, तर तब्बल १० हजार नागरिकांची वस्ती आहे; पण गेल्या चार वर्षांपासून हे लोक रस्त्याअभावी अक्षरश: नरकयातना भोगत आहेत.
विविध कार्यालये अन् संस्थांचीही पंचाईत
भावसिंगपुरा ते चिनार गार्डन हा १५० फुटांचा डीपी रोड, तर शनी मंदिर ते भावसिंगपुरा असा ८० फुटांचा डीपी रोड रेखांकनात दाखण्यात आलेला आहे. ८० फुटांच्या रस्त्यावर विविध संस्था आहेत. पडेगावच्या मुख्य रस्त्याला जोडलेल्या या मुख्य रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी नागरिक कित्येक दिवसांपासून करत आहेत. त्यासाठी आतापर्यंत त्यांनी अनेकांना निवेदने दिली. त्यासाठी पाठपुरावाही केला, पण त्यांना आजपर्यंत कुणीही दाद दिलेली नाही. रस्त्याचे काम झाल्यास एमएसईबीचे पॉवर हाऊस, शासकीय वसतिगृह व प्रशिक्षण केंद्र, हज हाऊसच्या जागेतील पुनर्वसित कुटुंबांची घरे, पडेगाव परिसरातील कत्तलखाना आणि या मार्गावर असणाऱ्या जवळपास सर्व नवीन वसाहतींची सोय होईल.
त्या रस्त्याबाबत आमच्याकडे अद्यापही कोणत्याच प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे या भागातील या रस्त्याचे काम रखडलेले आहे.
-वामन कांबळे, शाखा अभियंता
भावसिंगपुरा ते चिनार गार्डन या डीपी रोडसंदर्भातील आतापर्यंत झालेल्या कारवाईची माहिती घेऊन पुढील काम होईल. लवकरात लवकर काम करण्याबाबत आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू.
-एस. पी. खन्ना, मालमत्ता अधिकारी
महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पॅचवर्क तरी करावे, अशी मागणी सचिन लोखंडे, वेनसेन्ट दिवे, राजपाल पांडे, सुधीर वाघ, व्ही. आर. कांबळे, बाबासाहेब लिहणार तसेच या भागातील सर्व रहिवाशांनी केली आहे.
काय म्हणतात जबाबदार?
पाठपुरावा करत आहोत

रस्त्यावरील मालमत्ताधारकांना देण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. तरीसुद्धा आम्ही पाठपुरावा करत आहोत.
-कृष्णा बनकर, नगरसेवक
प्रस्ताव तयार आहे
शनी मंदिर ते भावसिंगपुरा या रस्त्याच्या कामासाठी २८ लाखांचा प्रस्ताव आहे. कामासाठी पाठपुरावा करणार आहे.
-सावित्रीबाई वाणी, नगरसेविका