पैठण- रोख एक लाख मला द्या, मी तुम्हाला दहा लाखांच्या नोटांचा पाऊस पाडून देतो, असे सांगत, मुंबई येथील एका व्यक्तीला फसवण्याच्या तयारीत असलेल्या भोंदू दांपत्याला पैठण एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता जेरबंद केले.
संतोष सांडू घोडे (४२) व त्याची पत्नी मिलन (३५) दोघे रा.निल्लोड ता.सिल्लोड जि.औरंगाबाद अशी आराेपींची नावे असून ते सध्या जैन स्पीनर स्टाॅप एमआयडीसी येथे किरायाच्या खोलीत राहतात. या दांपत्याने औरंगाबाद येथील तीन दलालांच्या मदतीने मुंबईच्या बड्या आसामीला एक लाख द्या तुमच्यावर दहा लाखांच्या पैशाचा पाऊस पाडून देऊ, तीन लाख दिले तर तीस लाखांचा पैशाचा पाऊस पडेल, असे आमिष दाखवले. सतीश दांडगे, रा.नारेगाव औरंगाबाद, संजय शिंदे, रा. टीव्ही सेंटर, ज्ञानेश्वर सोनवणे, रा. पानवडोद, ता. सिल्लोड अशी या दलालांची नावे असून त्यांना औरंगाबाद येथून अटक करण्यात आली. हा पाऊस पाडण्यासाठी मांडूळ जातीचा साप व घुबड आदी साहित्याची व्यवस्था करण्याचे हे दलाल सांगत.
मुंबई येथील एक व्यक्ती एक लाख रुपये घेऊन शुक्रवारी या दांपत्याकडे येणार होता. मात्र याची माहिती खबऱ्यामार्फत एमआयडीसी पोलिस ठाण्यातील सपोनि ज्ञानेश्वर पायघन यांना कळताच या दांपत्यावर शुक्रवारी पोलिसानी पाळत ठेवली. मुंबई येथील व्यक्ती आली नाही, मात्र या आरोपीच्या घरात एक ते दीड कोटी रुपये भासवण्यासाठी वर खरी नोट लावलेली पैशांची बंडले आढळली. म्हणजे बंडलात एक खरी नोट आणि खाली नोटांच्या आकाराचे कोरे कागद आढळून आले. या दांपत्याला शनिवारी पैठणच्या न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
ही पाच जणांची टोळी असून औरंगाबादमधून तीन दलालांना अटक करण्यात आली. यात मुंबई येथील कोण कोणत्या व्यक्ती या आरोपीकडे येणार होत्या याचा तपास पोलिस करत आहेत.