आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन बसवर दगडफेक; बुद्धगया बॉम्बस्फोटाचे औरंगाबादेत पडसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बुद्धगया येथील महाबोधी विहारात रविवारी पहाटे बॉम्बस्फोट झाल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होताच शहरात तणावपूर्ण शांतता पसरली. टाऊन हॉल आणि शिवाजी मैदानाजवळ तीन बसवर दगडफेक करण्यात आली. विविध पक्ष, संघटनांनी रास्ता रोको, सभा घेऊन बॉम्बस्फोटाच्या घटनेचा निषेध नोंदवला. भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मुंडण केले.

जाफराबाद आगाराच्या औरंगाबाद - भोकरदन या बसने (एमएच 20 बीएल 1086) दुपारी 12 वाजेच्या सुमारास टाऊन हॉलचा पूल ओलांडताच आमखास मैदान परिसरात त्यावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर एमएच 14 बीटी 1953 आणि एमएच 14 बीटी 1878 या दोन शहर बसवरही याच परिसरात दगडफेक झाली. त्यानंतर एका जमावाने या भागातील दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. तर, सायंकाळी एकतानगर भागातही दुकाने बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या जमावाला बेगमपुरा पोलिसांनी पांगवले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले.

सकाळी साडेअकरा वाजता आंबेडकरनगर येथे भारिप बहुजन महासंघाच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. सभेनंतर 25 कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध म्हणून मुंडण करून घेतले. या आंदोलनात महेंद्र सोनवणे, साईनाथ गायकवाड, उत्तम बनकर, कल्याण गायकवाड, महेंद्र राऊत, जगदीश मोकळे, रमेश लहाने यांचा सहभाग होता. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांच्या नेतृत्वात किलेअर्क भागातील त्यांच्या कार्यालयासमोर दुपारी एक वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी अमित भुईगळ यांना ताब्यात घेतले. मात्र, आंदोलनात सहभागी महिलांनी जीप रोखून धरत भुईगळ यांना सोडण्याची मागणी केली.