आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्‍ये बड्यांची बांधकामे सर्रास सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पिण्यासाठीच पाणी उपलब्ध होत नसल्याने सातारा परिसरातील सर्व बांधकामे थांबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी एप्रिलच्या सुरुवातीला दिले होते. मात्र, प्रत्यक्षात येथील बांधकामे बंद झालीच नसल्याचे डीबी स्टारच्या पाहणीत स्पष्ट झाले. जिल्हाधिकार्‍यांचा आदेश झुगारून इमारतींचे बांधकाम सर्रासपणे सुरू आहे. एकीकडे या बांधकामांसाठी भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा सुरू आहे, तर दुसरीकडे सातारा परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी फरपट सुरू आहे. डीबी स्टारने सातारा परिसरात छापा मोहीम हाती घेतली असता बांधकाम व्यावसायिक, शासकीय अधिकारी आणि इतरांची बांधकामे सुरू असल्याचे दिसून आले.

या भागात बांधकामांना ऊत
सातारा भागातील ऊर्जानगर, शिवछत्रपती नगर, आलोकनगर, न्यू विद्यानगर, संग्रामनगर, सम्राटनगर, विजयंतनगर, सातारा गाव, एमआयटी महाविद्यालय परिसर, श्रद्धा विहार, एकतानगर, लक्ष्मी कॉलनी, मीनाताई ठाकरेनगर, सप्तशृंगी नगर, सर्वेश्वर नगराची पाहणी डीबी स्टार प्रतिनिधीने केली असता ठिकठिकाणी बांधकामे सुरू असल्याचे निदश्र नास आले.

नागरिकांची पाण्यासाठी पायपीट
सातारा परिसरात पाणीपुरवठा योजना नसल्याने येथील नागरिक विहिरी, बोअर, कूपनलिकांवर विसंबून आहेत. मात्र, यंदा पाऊस कमी झाल्याने भूगर्भातील जलसाठेही आटले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वापराच्या तुलनेने बांधकामांसाठी जास्त पाणी लागत आहे.

पाण्याचा भरमसाट उपसा
या भागातील खासगी बोअरमालक आणि विहीर मालकांनी पाणी विक्रीसाठी जोरदार उपसा सुरू केला आहे. बीड बायपास रस्त्यालगत असलेल्या बाकलीवाल बावडी, विजयानंद सोसायटीलगतच्या विहिरीतून पाण्याचा भरमसाट उपसा सुरू आहे.

वीटभट्टय़ांना दिले जाते पाणी
गट क्रमांक 180 ते 182 या परिसरात सातारा गावठाणालगतच्या एका वीटभट्टीवर भरमसाट पाण्याचा मारा केला जात आहे. याबाबत टँकर मालक हकीम पटेल यांना विचारले असता, बाकलीवाल विहिरीतून आम्ही दररोज 50 टँकर पाणी भरतो, असे सांगितले.


छत्रपतीनगर
त्यात काय एवढे ?
आमच्या घराचे 90 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. किरकोळ कामे सुरू आहेत. मी सीआयडी शाखेत पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. थोडेफार चालायचेच, त्यात काय एवढे?
शांतीनाथ राठोड, उपनिरीक्षक, सीआयडी


संग्रामनगर
बांधकामे बंद करतो

माझ्या इमारतीचे 90 टक्के बांधकाम झालेले आहे. किरकोळ कामे शिल्लक आहेत. यासाठी मी माझ्या स्वतंत्र बोअरचे पाणी वापरत आहे. त्यालाही फारसे पाणी नाही. हवे तर किरकोळ कामेही बंद करतो.
लक्ष्मण बोडखे, माजी दारूबंदी अधिकारी


श्री गणेश अपार्टमेंट
किरकोळ कामे सुरू

इमारतीचे बांधकाम 15 एप्रिलपूर्वीच बंद केले होते. मात्र, घरे बुक करणा-यांना ताबा पावती द्यायची असल्याने 15 फूट वॉल कंपाउंड आणि किरकोळ कामे सुरू आहेत.
विनायक जोशी, मुख्य व्यवस्थापक,
श्री गणेश अपार्टमेंट


दिशा कन्स्ट्रक्शन
किरकोळ कामे सुरू

आरसीसीचे काम पूर्ण झाले आहे. आता तेथे केवळ फिनिशिंगचे, इलेक्ट्रिकचे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम सुरू असल्याचे मला सांगण्यात आले. किरकोळ कामांसाठी आम्ही बाहेरून पाणी आणतो. मात्र, ही सर्व बांधकामे दिशा कंपनीमार्फत होत आहेत.
श्रीकांत जोशी, माजी आमदार


पाणी वापर नाही
पाणी लागत नाहीत अशीच कामे करत आहोत. लोकांशी करार केला आहे. त्यानुसार फक्त इतर कामे करत आहोत. पाण्याची कामे सुरू नाहीत
देवानंद कोटगिरे, दिशा कन्स्ट्रक्शन


आनंद अग्रवाल
काम बंद केले आहे

सर्वांची बांधकामे सुरू आहेत. मलाच का टार्गेट केले जात आहे? इमारतीची किरकोळ कामे सुरू होती. डीबी स्टार प्रतिनिधीसोबत बोलणे झाल्यावर सर्व कामे बंद केली आहेत.
आनंद अग्रवाल


शांग्रिला बिल्डर्स
नोटीस दिलेली नाही

सलीम अकबर यांची ही इमारत आहे. मजुरांना दुष्काळात मजुरी मिळावी या उद्देशाने कामे सुरू ठेवली आहेत. ग्रामपंचायतीने आम्हाला काम बंद करण्याची नोटीस दिलेली नाही.
ओवेस खुर्चीवाला, मुख्य व्यवस्थापक


अनधिकृत बांधकामे सर्रास सुरू
सातारा परिसरात शेकडो अनधिकृत बांधकामे सर्रासपणे सुरू आहेत. एफएसआयच्या पाच पटपर्यंत अधिक बांधकामे सुरू आहेत. त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. खुलेआम सुरू असलेला हा प्रकार अधिका-यांना दिसत कसा नाही, हा खरा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधीदेखील अशा कामांना अभय देत आहेत. यामुळे बांधकामे झाल्यानंतर कारवाई झाली तर सामान्य खरेदीदाराची फसवणूक होऊ शकते.


आधी अनधिकृत बांधकामे थांबवा
पाच हजार चौरस फुटांच्या प्लॉटवर 20-20 फ्लॅटच्या योजनांचे काम सुरू आहे. यामुळे चटई क्षेत्र निर्देशांकाचे सर्रास उल्लंघन होत आहे. बांधकाम परवान्यावर ग्रामपंचायतीचा शिक्का मारून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. आम्ही नियमानुसार परवानगी घेऊनच बांधकामे करत आहोत. सातारा परिसरात पाणीटंचाई पाहता लोकांच्या हितार्थ आम्हीच जिल्हाधिका-यांना बांधकामे बंद करण्यास सांगितले होते. मात्र, अधिकृत बांधकामे बंद करून अनधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू ठेवायची, हा कुठला न्याय आहे?
प्रमोद खैरनार, राज्य उपाध्यक्ष,
क्रेडाई


थेट सवाल
विक्रम कुमार
जिल्हाधिकारी
स्वत: पाहणी करणार..
* साता-यात तुमच्या आदेशाची पायमल्ली होत आहे...
माझ्याकडे असे रिपोर्ट नाहीत. फक्त पाण्याशिवायच्या कामांना परवानगी दिली आहे.
* यंत्रणा योग्य काम करत नसल्याने काही बड्यांना, अवैध बांधकामांना अभय मिळत आहे..
असे व्हायला नको. तहसीलदारांना आजच पाठवतो. स्वत:देखील पाहणी करणार.
* नियमाने काम करत असलेल्या बिल्डरांना फटका बसत आहे, त्याचे काय ?
तीव्र पाणीटंचाईपुढे काहीही करू शकत नाही. मात्र, नियम सर्वांसाठीच आहेत. सगळ्यांवर कारवाई होईल.
* सिडकोकडून बांधकाम परवानगीची यादी मिळत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे?
असा कोणताही प्रश्न नाही. कोणतीही बांधकामे सुरू राहायला नको. तत्काळ कारवाई होईल.
* सातारा परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे होत आहेत, त्यांना कोण रोखणार?
अवैध कामांवर आज ना उद्या कारवाई होणारच. मात्र, आज प्रश्न दुष्काळाचा आहे. सर्वांनी
सहकार्य करावे. नाही तर कडक कारवाई होईल.

काय म्हणतात अधिकारी
याद्या आल्यावर कारवाई
पाण्याचा गैरवापर होत असेल तर दंड आकारणे हा त्यावर पर्याय आहे. मात्र, सिडको आणि ग्रामपंचायतीने बांधकाम परवान्यांची यादी आम्हाला दिलेली नाही. त्यामुळे कारवाई करणे शक्य होत नाही. दोन्ही विभागांना पत्र पाठवले आहे. यादी आल्यावर कारवाई करू.
विजय राऊत, तहसिलदार


तहसिलदारांनी कारवाई करावी
तहसिलदारांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही 50 लोक ांना बांधकाम थांबवण्याच्या सूचना दिल्या. मात्र, हे लोक तात्पूरते बांधकाम बंद केल्याचे दाखवून पुन्हा सुरू करतात. त्यांच्यावर आत तहसिलदारांनीच दंडात्मक कारवाई करावी.
एस. एम. ठेंगे, मंडळ अधिकारी/अनिल शिंदे, तलाठी


अधिकार काढून घेतले
सातारा ग्रामपंचायतीकडून जुलै 2008 पासून बांधकाम परवाना देण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे आम्हाला परवानाधारकांची आकडेवारी सांगता येणार नाही. ज्यांनी एनए 44 केले असेल त्यांनाच बांधकाम परवाना मिळतो.
ए. एस. गाडेकर, ग्रामविस्तार अधिकारी


दोन दिवसात यादी पाठवतो
सातारा परिसरातील ज्या लोकांना सिडक ोने ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे त्यांचा सर्व्हे चालू आहे. यादी तयार असून दोन दिवसात पाठवली जाईल.
डी. डी. वळवी, मुख्य प्रशासक, सिडको


पाणी मिळत नाही
आठ दिवसातून एकदा येणा-या टँकरवरून पाणी भरण्यासाठी गर्दी होत असल्याने कधी पाणी मिळते कधी मिळत नाही. याउलट परिसरात दिवस-रात्र बांधकामांसाठी पाण्याचा वापर केला जात आहे.
आर. एन. निकम


अधिकारी गप्प आहेत
सातारा ग्रामपंचायतीवर आता लोकांचा विश्वास राहिला नाही. जिल्हाधिका-यांनी आदेश देऊनही तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामविस्तार अधिकारी मूग गिळून गप्प आहेत.
पी. व्ही. औरंगाबादकर, जेष्ठ समाजसेवक


ग्रामपंचायतीकडून अभय
या बांधकाम व्यावसायिकांना ग्रामपंचायतीकडून अभय मिळत आहे. परिसरातील सुमारे 65 हजार लोकांना पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. मात्र, दुसरीकडे बांधकामांसाठी सर्रासपणे पाण्याचा वापर होत आहे. ग्रामविस्तार अधिकारीही याकडे दुर्लक्ष करतात.
शकुंतला साबळे, ग्रामपंचायत सदस्य


महसुल विभागाने अधिकृत पत्र दिले नाही
जिल्हाधिका-यांच्या आवाहनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा पाठवल्या, पण ते आम्हाला शासनाचे अधिकृत पत्र दाखवा, असे म्हणतात. हे अधिकृत पत्र महसूल विभागाने आम्हाला दिलेले नाही.
अयुबखान जब्बारखान पठाण, उपसरपंच