आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बड्या नेत्यांच्या सभांमुळे बंडखोरांची पंचाईत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या दोन दिवसांपासून शहरात शिवसेना तसेच भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या सभा सुरू झाल्याने या पक्षांच्या बंडखोरांची पंचाईत झाली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रचारात उतरवण्यात बंडखोरांना यश आले असले तरी पक्षादेश असल्याने ही मंडळी मोठ्या सभांना जाऊ लागली आहेत. शहरात मोठी सभा सुरू असताना कार्यकर्त्यांना वाॅर्डात ठेवून प्रचार सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान बंडखोरांसमोर आहे.

शुक्रवारी शिवसेनेच्या युवा आघाडीचे प्रमुख आदित्य ठाकरे शहरात आले होते. त्यांनी शिवाजीनगरपासून रोड शोला सुरुवात केली. शिवाजीनगर ते समर्थनगर दरम्यान गर्दी करण्याचे आव्हान संबंधित ठिकाणच्या उमेदवारांना दिले होते. या पट्ट्यात काही ठिकाणी बंडखोर मैदानात आहेत. कार्यकर्ते रोड शोला गेले तर मतदारांत वेगळाच संदेश जाईल, अशी भीती बंडखोरांना होती. त्यामुळे यातील काहींनी कार्यकर्त्यांना ‘वेगळ्या’ कामात गुंतवून ठेवले. बंडखोरांचे काम करणारे कार्यकर्ते जर पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमाला गेले तर ते बंडखोरांसोबत नाहीत, असा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे पुढील दोन दिवस बंडखोरांना आपले कार्यकर्ते पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमाला जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. पुढील दोन दिवस शिवसेना तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा होणार असल्याने बंडखोरांना दक्ष राहावे लागेल. युतीच्या वाॅर्डांत ४० जणांनी बंडखोरी केली असून कार्यकर्त्यांना आपल्याच पूर्वीच्या पक्षापासून दूर ठेवण्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.

सभेची भीती का ?
बंडखोरांना पक्षाचे कार्यकर्तेच मदत करताहेत. मात्र, ते जाहीरपणे समोर येत नाहीत. परंतु पक्षाची मोठी सभा असल्यास त्यांच्यावर पक्षाकडून गर्दी करण्याची जबाबदारी देण्यात येते. त्यामुळे त्यांनी सहकाऱ्यांसोबत सभेला उपस्थित राहणे अपेक्षित असते. नेमकी तेव्हाच बंडखोरांची पंचाईत होते. पक्षाच्या अधिकृत सभेला समर्थक गेले तर ते पक्षाचा प्रचार करत असल्याचा संदेश जाऊ शकतो, ही भीती राहते. कारण आता प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला असून अशा परिस्थितीत बंडखोरांच्या मागे कोणी नाही, असे समजल्यास विजयाची शक्यता कमी होऊ शकते.

असे आहे चित्र
२१ शिवसेनेचे बंडखोर
१५ भाजपचे बंडखोर

या बंडखोरांतून किमान १२ ते १८ जण निवडून येऊ शकतात, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

एकाच क्लिकवर कळणार कोणत्या हॉलमध्ये मतदान
मतदानाच्या दिवशी बूथवर नाव, हॉल क्रमांक शोधता मतदारांची मोठी दमच्छाक होते. परंतु आता मतदारांना दिलासा देणारी बातमी आहे. एमआयटी महाविद्यालयात शिकणाऱ्या बळीराम काकासाहेब बाबरने निवडणुकीसाठी विशेष साॅफ्टवेअर तयार केले आहे. सॉफ्टवेअरमध्ये केवळ नाव टाकले की, मतदाराची सर्व माहिती मिळणार आहे.

न्यू हनुमाननगरातील बळीराम कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. त्याने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये गजानननगर वॉर्ड क्रमांक ९४ मधील संपूर्ण मतदारांची माहिती साठवण्यात आली आहे. कॉम्प्युटरमध्ये मतदाराचे नाव टाकल्याबरोबर एका क्लिकवर कोणत्या हॉलमध्ये जाऊन मतदान करायचे हे कळणार आहे. मतदानाच्या दिवशी सुधाकरराव नाईक विद्यालयासमोर मतदारांना मदत करणार असल्याचे त्याने सांगितले. मतदानाच्या दिवशी कुठल्या केंद्रावर जायचे, आपला मतदार यादीतील क्रमांक कोणता हे पाहण्यासाठी विविध पक्षांच्या स्टॉलमध्ये जावे लागते. तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. क्रमांक शोधताना बराच वेळ वाया जातो. ही बाब लक्षात अाल्याने बळीरामने निवडणूक सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यात प्रथम मतदाराचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, लिस्ट नंबर, घर क्रमांक, वोटर आयडी क्रमांक, वय, पुरुष व महिला अशी सर्व माहिती मिळणार आहे.