आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारला करोडो, दुष्काळी मराठवाड्याला का नाही? उद्धव ठाकरे यांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी खुलताबाद येथे शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली.  छाया : अरुण तळेकर - Divya Marathi
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी खुलताबाद येथे शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली. छाया : अरुण तळेकर
औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून बिहारला कोट्यवधी रुपयांची मदत जाहीर केली. बिहारला मदत देण्याबद्दल आमचा आक्षेप नाही. तेथे जर सढळ हाताने मदत केली जात असेल, तर दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी काय केले? त्यांना दिली तशीच मदत आम्हाला का नाही, असा रोखठोक प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्राला शनिवारी विचारला.

शिवसेनेतर्फे खुलताबाद, फुलंब्रीत जिल्ह्यातील २ हजार शेतकऱ्यांना आर्थिक, जीवनावश्यक मदत देण्यात आली. त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. उद्धव म्हणाले, ‘बिहारला केंद्र सरकारने मदत केली, त्याला आमचा आक्षेप नाही. मदत केलीच पाहिजे. बिहारला ‘खास बाब’ म्हणून मदत दिली. तशीच खास मदत मराठवाड्याला द्या. सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याबरोबरच भविष्यकालीन उपाययोजनांसाठी पैसा द्या. त्यामुळे पुन्हा असे संकट आले तर त्याची तीव्रता एवढी जाणवणार नाही. त्यासाठी मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार आहे.

नालेसफाईची चौकशी कराच
उद्धव यांनी भाजपवरही जोरदार टीकास्त्र सोडले. नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च झाल्यानंतरही पावसाळ्यात मुंबईतील नाले तुंबले होते. त्याची चौकशी करण्याचे भाजपने ठरवले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने मांस विक्री बंदीचा मुद्दा उचलून धरला का, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, नालेसफाईची चौकशी अवश्य करा, इतकेच काय शक्य असतील तर अन्य कोणत्याही चौकशा करा. नागपुरात नाले तुंबले. तेथे तर भाजपची सत्ता आहे, अहमदाबाद, सुरत, दिल्ली येथेही नाले तुंबले. तेथील नालेसफाईचे काय? आता तर जपानमध्येही अशीच परिस्थिती आहे. तेथे शिवसेना आहे का? असा प्रतिप्रश्नच त्यांनी विचारला.
कृपया अजित पवारांना कोणत्याही धरणावर नेऊ नका!
दुष्काळ जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जेलभरो आंदोलन करणार आहे. इतकी वर्षे सत्तेत राहूनही अशी वेळ का आली, याचा विचार त्यांनी करावा. आम्हाला यात राजकारण करायचे नाही. त्यांनीही सोबत यावे, सर्व मिळून चांगले काही करू. ते आता पाण्यासाठी आंदोलन करताहेत. तेव्हा पाणी सोडण्यासाठी याच पक्षाचे अजित पवार काय म्हणाले होते हे सर्वानाच माहिती आहे. त्यांना एक विनंती आहे. सध्या पाण्याचा तुटवडा आहे. तेव्हा कृपया अजित पवार यांना णत्याही धरणावर नेऊ नका.
निधी कधी देता? : केंद्राचे पथक मराठवाड्याचा दुष्काळ पाहून गेले. पथकाने काही ठिकाणीच पाहणी केली. पाहणीनंतर आता निर्णय घेण्यास विलंब कशासाठी, कधी निधी देणार, असा प्रश्नही ठाकरे यांनी विचारला.
पर्युषण पर्वाचा वाद शिवसेनेकडून संपला
पर्युषण पर्व काळात मुंबई व नवी मुंबई परिसरात मांस विक्रीस मनाई करण्याच्या निर्णयास शिवसेनेने जोरदार विरोध केला आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून त्यावर कडाडून टीका करण्यात आली. त्यानंतर हा वाद देशभर पेटला होता. आरोप-प्रत्यारोप होत असताना आता उद्धव काय बोलतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. परंतु हा वाद आमच्याकडून संपला असल्याचे उद्धव यांनी सांगितले.