आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरारक स्टंटला तरुणांचे वन्स मोअर, प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणार्‍या साहसी कसरती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वय वर्षे अठरा.. परंतु वजनदार स्पोर्टी बाइक हवेत उंचावण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे होते. जीव मुठीत घेऊन मोटारसायकलस्वाराने वेगात दामटलेल्या बाइकने अचानक हवेत उसळी घेतली आणि हजारो बघ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. एमजीएम कॅम्पसच्या मैदानावर रविवारी औरंगाबादकरांना एका वेगळय़ाच साहसाचा अनुभव आला. वन्स मोअर आणि टाळय़ांच्या कडकडाटात अवघे मैदान दुमदुमून गेले.

मुश्ताक, शेखरसिंग आणि हासिम अशी या धाडसी तरुण-तरुणींची नावे. ते पुण्यात शिक्षण घेत आहेत. सुमारे चार हजार प्रेक्षकांनी एमजीएम परिसरात, बाहेरही खच्चून गर्दी केली. बजाज केटीएमच्या नव्या बाइकचे प्रमोशन करण्यासाठी कंपनीने या स्टंट शोचे आयोजन केले होते. कधी मागच्या चाकावर, कधी सीटवर, तर कधी इंधन टाकीवर बसून वेगवान बाइक जागेवर स्लिप करणारी त्यांची कृती सर्वांनाच स्तिमित करीत होती. कधी दोन हात सोडून प्रेक्षकांना फ्लाइंग किस, तीन गाड्यांची टक्कर आणि धुराचे हवेत उडणारे लोट असे पोटात गोळा उठवणारे थरारक स्टंट रायडर्सनी केले. स्टंट मोबाइलमध्ये कैद करण्यासाठी प्रेक्षकांची धडपड सुरू होती. चिमुकले, महिला आणि ज्येष्ठांनी स्टेडियमच्या तीन मजल्यांवर गर्दी केली होती. बजाज केटीएमचे महाव्यवस्थापक ईश्वरसिंग खुराणा, पगारिया ऑटोचे संचालक राहुल पगारिया उपस्थित होते.