आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाक्या जाळणार्‍या माथेफिरूंचा हैदोस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हडकोतील टीव्ही सेंटर भागात मंगळवारी मध्यरात्री एक दुचाकी जाळल्यानंतर दोन कार जाळण्याचा प्रयत्न माथेफिरूंनी केला. हे माथेफिरू अद्याप पोलिस अथवा लोकांच्या हाती लागले नाहीत. गेल्या तीन महिन्यांपासून या विकृत मनोवृत्तींनी पश्चिम आणि पूर्व औरंगाबादमध्ये हैदोस घातला आहे. घरासमोर असलेली वाहने अकारण पेटवून देणे आणि पळून जाणे असला उपद्रव ते करीत आहेत. या दोन भागांत माथेफिरूंनी आतापर्यंत 14 वाहने जाळली असून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे.
दीड वर्षापूर्वी शेजारच्या वाळूज महानगरात वाहने जाळण्याचे प्रकार सुरू झाले. 2012-13 मध्ये वाळूजमध्ये आतापर्यंत 73 वाहने विकृतांनी जाळली असून त्यात 57 दुचाक्या आणि 16 कारचा समावेश आहे. निशाचरांसारखे रात्री टोळक्याने फिरणे आणि घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांना पेटवून पोबारा करणे अशी या माथेफिरूंच्या कृत्याची पद्धत आहे. दोन्ही शहरातील पोलिसांना हे माथेफिरू गुंगारा देत आहेत. वाळूजनंतर माथेफिरूंनी शहरात घुसखोरी केली असून आतापर्यंत त्यांनी 87 वाहनांची नासधूस केली आहे. 90 टक्के सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत : अपार्टमेंट व मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्याने समाजकंटकांचे फावत आहे. मंगळवारी मध्यरात्री हडको परिसरातील रंजनवन सोसायटीत दुचाकी जाळण्यात आली असून दोन कार पेटवण्याचा प्रयत्न झाला. या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असते तर पोलिसांना माथेफिरूंना पकडणे सोपे गेले असते. शहरातील 90 टक्के सोसायट्या, अपार्टमेंटच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. शिवाय 70 टक्के ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने चोर्‍या वाढल्याचे उघड झाले आहे.

या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने शहरातील विविध भागांत फिरून सुरक्षेच्या उपाययोजनांची पाहणी केली. त्या वेळी बहुतांश ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे समोर आले. सोसायट्या, मोठे अपार्टमेंट, कॉलनी आदी भागांत सीसीटीव्ही बसवण्याचा खर्च परवडण्याजोगा आहे; परंतु ही यंत्रणा बसवण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याने चोरट्यांना जेरबंद करणे पोलिसांसमोर आव्हान झाले आहे. अशा घटनांपासून वाचायचे असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक असल्याचे पोलिस अधिकार्‍यांचेही म्हणणे आहे. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर चोरटा किंवा गाड्या जाळणारा माथेफिरू सहज त्यात कैद होऊ शकतो आणि पोलिस तपासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते.शिवाय आरोपीविरुद्ध शिक्षा मिळवण्यासाठी हा भक्कम पुरावा मानला जातो.

‘रंजनवन’चे रहिवासी संतप्त : हडकोतील रंजनवन सोसायटीत मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेनंतर काही माथेफिरूंनी प्लॉट क्र. 96 समोरील गणेश अरविंद व्यवहारे यांची बजाज डिस्कव्हर (जीजे 15 एलएल 3762) जाळली, तर शेजारील नारायण कुलकर्णी यांची ह्युंदाई कंपनीची कार (एमएच 20 बीवाय 2493) आणि डॉ. झिंजुर्डे यांची स्विफ्ट कार (एमएच 20 बीएन 2696) या दोन गाड्या जाळण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात व्यवहारे यांनी बुधवारी दुपारी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. व्यवहारे यांचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय असून त्यांचे कार्यालय सुदर्शननगरमधील तेजस कॉम्प्लेक्समध्ये आहे. दुचाकीचे 20 आणि दोन्ही कारचे 20 हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे रंजनवन सोसायटीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सीसीटीव्ही स्वस्त : पूर्वीच्या तुलनेत सीसीटीव्ही कॅमेरे आता स्वस्त झाले आहेत. सोसायटीत मुख्य प्रवेशद्वार, पार्किंग स्थळ आदी महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसवणे अत्यंत गरजेचे आहे. सीसीटीव्ही 15 हजार ते 70 हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. या रकमेत एकूण चार कॅमेरे मिळू शकतात.