आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"सुखना'काठी भरला पक्षिप्रेमींचा मेळा "बर्ड फेस्ट' उदंड प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरानजीकच्या सुखना प्रकल्पाकाठी पक्षिप्रेमींनी शुक्रवारी पक्षिनिरीक्षणाचा मनसोक्त आनंद घेतला. नानाविध प्रकारचे निवासी, स्थलांतरित पक्षी आणि शेकडो पक्षिप्रेमींचा जणू मेळाच येथे भरला होता. आजवर पुस्तकात किंवा टीव्हीवर दिसणारे पक्षी पहिल्यांदा तलावाकाठी जाऊन पाहताना अनेकांचा चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. शुक्रवारची रमणीय सकाळ कधीही विसरता येण्यासारखी असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशन अकॅडमी औरंगाबाद, नेचरवॉक पुणे, वन विभाग, वन्यजीव विभाग सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने "बर्ड फेस्ट'चे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत सुखना मध्यम प्रकल्पावर पक्षिनिरीक्षण कार्यक्रम झाला. पक्षी अभ्यासक डॉ. दिलीप यार्दी, डॉ. किशोर पाठक, शिल्पा गोले, स्वप्निल मोगरे यांनी प्रकल्पावरील सर्व पक्ष्यांची माहिती दिली. या वर्षी पावसाळा, हिवाळा दोन्ही लांबल्याने दरवर्षीच्या तुलनेत स्थलांतरित पक्ष्यांची संख्या घटली आहे. त्यांच्या आगमनाचा काळ लांबला असून नोव्हेंबर, डिसेंबरला येणारे पक्षी जानेवारीत येत असून फेब्रुवारीपर्यंत त्यांचे आगमन होत राहील, असे डॉ. यार्दी म्हणाले.
पक्षिनिरीक्षण करण्यासाठी शेकडो पक्षिप्रेमींची उपस्थिती होती. "ब्लॅक विंग स्टील्ट' पक्ष्याचा स्वछंद विहार न्याहाळताना पक्षिप्रेमी. छाया : दिव्य मराठी

*बार हेडेड गीज
* नॉर्थन शॉव्हेलर
*नॉर्थन पिंटेल
*कॉमन टील
*पाइड अॅव्हाकेट
*पेंटेड स्टॉर्क
*ग्रे हेरॉन
*ब्लॅक विंग स्टील्ट
*स्पून बिल
*व्हाइट नेक्ड स्टॉर्क
*सँडपाइपर

१५० पक्षीप्रेमींची उपस्थिती
२५ प्रकारचे एकूण पक्षी सुखना परिसरात आढळतात
०४ प्रकारचे स्थलांतरित पक्ष्यांची संख्या

पक्षी पर्यटनातून मिळेल रोजगार
-सुखनामध्यम प्रकल्पाला पक्षी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करता येऊ शकते. स्थानिक शेतकऱ्यांनी येथे छोट्या झोपड्या टाकून थोड्याफार सुविधा उपलब्ध केल्यास प्रकल्पाला भेट देणाऱ्या पक्षिप्रेमींची संख्या वाढेल. इको-टुरिझमसाठी हा उत्तम पर्याय आहे. यातून पक्ष्यांचा सांभाळही होईल आणि स्थानिकांना रोजगारही मिळेल. डॉ.दिलीप यार्दी, पक्षी अभ्यासक.

फोटोग्राफी शिकलो
-पक्षी अभ्यासकांनी अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती दिली. भरपूर नवीन गोष्टी कळाल्या. पक्षिनिरीक्षणासोबत पक्ष्यांचे फोटो कसे काढावेत हेसुद्धा शिकता आले. अनिरुद्धदापके.

अविस्मरणीय अनुभव
-पक्षिनिरीक्षण करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. आजवर केवळ ऐकीव माहिती असलेले देशी-विदेशी पक्षी दुर्बिणीच्या साहाय्याने अगदी जवळून पाहता आले. मनीषाफुनुसनाळे-सावरगावे

पाणी उपशामुळे हानी
-सुखनाच्या प्रकल्पातून शेतीसाठी प्रचंड पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे पक्ष्यांचा येथील अधिवासच धोक्यात आला आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. डॉ.किशोर पाठक, पक्षी अभ्यासक.

उपक्रम उपयोगी
-जायकवाडीप्रमाणेसुखना प्रकल्पातही पक्ष्यांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. पक्ष्यांचे संरक्षण आणि पर्यावरणाचे संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम उपयोगी आहे. शिल्पागोले, पक्षी अभ्यासक.