आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना साडी, ना गाडी आईच्या वाढदिवसानिमित्त भेट दिली लिफ्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एकेदिवशी घरात शांतपणे बसले होते. माझा मुलगा सीताराम आला. त्याने मला विचारले, आई ८१ व्या वाढदिवसानिमित्त तुला कोणती गाडी भेट देऊ? मी म्हणाले, गाडी नको, आता मी फारशी फिरत नाही. मग तो म्हणाला, आई, तू ज्येष्ठ नागरिक मंडळात जात होतीस ते बंद का केलेस? तिथे जाण्याने तू आनंदी राहतेस. मी सांगितले, पायांमुळे दोन जिने वर चढणे आता शक्य नाही. तो लगेच म्हणाला, गाडीऐवजी मी गीता भवनाला लिफ्ट लावून देतो. माझ्या मुलाने मला वाढदिवसाची भेट म्हणून ना साडी दिली, ना गाडी. थेट लिफ्ट दिली, अशा शब्दांत मुलाच्या प्रेमाचे भरभरून कौतुक करताना शांताबाई अग्रवाल यांचा चेहरा उजळून निघाला होता. आईच्या प्रेमाखातर महागडी भेटवस्तू देणाऱ्या मुलांची उदाहरणे अनेक आहेत. पण आईला अशी अनोखी भेट देणारा मुलगा शोधून सापडणार नाही. विशेष म्हणजे ही लिफ्ट फक्त स्वत:च्या आईसाठी नाही तर परिसरातील सर्व ज्येष्ठांची सोय करणारी आहे. एन-५ येथील गीता भवनात १९९५ पासून शांताबाई सदस्य होत्या. संघातील आरोग्यसेवेची जबाबदारी त्यांनी उचलली. या आरोग्य केंद्रात लागणाऱ्या औषधांचा दरमहा खर्च त्या गेली अनेक वर्षे देत आहेत. सूनबाई छाया अग्रवालही १५० गाईंचा सांभाळ करतात. एन-१ मध्ये वास्तव्याला असलेल्या अग्रवाल कुटुंबात समाजसेवेचे बीज रुजलेले आहे, याचेच हे द्योतक आहे. शांताबाई गृहस्थाश्रमातून निवृत्त झाल्याने त्यांनी ज्येष्ठांच्या कार्यक्रमांत सक्रिय सहभाग घेतला होता. पण वयोमानानुसार गुडघ्यांच्या तक्रारी सुरू झाल्याने बाहेर फिरणे कमी झाले होते.
सहा महिन्यांत लिफ्ट सेवेत हजर होईल
^ही लिफ्टबाहेरच्या बाजूने बसवली जाईल. यासाठी बांधकामात काही बदल करावे लागणार आहेत. येत्या सहा महिन्यांत लिफ्ट ज्येष्ठांच्या सेवेत रुजू होईल. -सीताराम अग्रवाल

ऊर्जा देणारा विरंगुळा
या ज्येष्ठ नागरिक संघात स्फूर्ती महिला मंडळाचेही कार्यक्रम चालतात. कलागुणांना वाव देण्यासोबतच उत्तमोत्तम मार्गदर्शक व्याख्यानांचे कार्यक्रमही येथे रंगतात. यासोबतच एकाच वयाचे सगळे जण जमून सुखदु:खांची देवाणघेवाण करत असल्याने वेळ तर चांगला जातोच, शिवाय हा विरंगुळा ऊर्जा देणारा आहे, असे शांताबाई म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...