आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी फीव्हरमुळे भाजपचे आक्रमक आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नरेंद्र मोदी यांची भाजपच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी झालेली निवड भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारी ठरली असून गुरुवारी औरंगाबादेत करण्यात आलेल्या आक्रमक जेल भरो आंदोलनामुळे मोदी फीव्हर कामाला आल्याचे दिसले. लालकृष्ण अडवाणी ज्येष्ठ आणि पूजनीय नेते असले तरी नरेंद्र मोदींना भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेता म्हणून मनापासून स्वीकारले असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.


मराठवाड्यात शिवसेनेच्या साथीने वाढलेल्या भाजपने गुरुवारी केलेले आंदोलन गेल्या दशकभरातील मोठे आंदोलन होते. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांतून कार्यकर्ते
मोठ्या संख्येने आले होते. प्रदेशाध्यक्ष झाल्यावर फडणवीस प्रथमच मराठवाड्यात येत असल्याने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पहिलेच आंदोलन करण्यात आल्याने तरुण कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शिवाय नेहमीच्या भाजपछाप आंदोलनापेक्षा या आंदोलनाचा चेहराही वेगळा होता.


कार्यकर्ते आक्रमकपणे घोषणा देत आंदोलनस्थळी ठिय्या देऊन होते. हे आंदोलन आक्रमक होण्यामागे नरेंद्र मोदींचा उदय असल्याचे स्पष्ट जाणवत होते. भाजप कार्यकर्ते मोदी फीव्हरमुळे आक्रमकतेने सक्रिय झाले असल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तर आंदोलनस्थळी भाषण करताना नरेंद्र मोदी हेच भाजपचे नेते असल्याचे जाहीर सांगितले.


यासंदर्भात बोलताना भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने पक्षात झालेल्या घडामोडी फायदेशीर असल्याचे सांगताना भाजप कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मनापासून स्वीकारले आहे, असे सांगितले. लालकृष्ण अडवाणी हे आमचे ज्येष्ठ आणि पूजनीय नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पक्ष निवडणुकांना सामोरा जाणार आहे, अशी पुस्तीही
त्यांनी जोडली.