आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळावर उपाय सुचवायला उशीर, काँग्रेसच्या विरोधात निदर्शने, खा. दानवेंचे पवारांवर टीकास्त्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- संसदेतगोंधळ घालणाऱ्या काँग्रेस खासदारांचा भारतीय जनता पार्टीने क्रांती चौकात रविवारी (१६ ऑगस्ट) निदर्शनाच्या माध्यमातून निषेध केला. याप्रसंगी दुष्काळावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना दुष्काळावर उपाय सुचवण्यास वेळ झाल्याचे सांगितले.

काँग्रेसच्या खासदारांनी संसदेचे कामकाज होऊ दिले नसल्याच्या निषेधार्थ भाजपच्या आैरंगाबाद शहर शाखेतर्फे निदर्शने करण्यात आली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भूमी अधिग्रहण विधेयक, दलितांचे प्रश्न दुष्काळ या विषयांवर चर्चा आवश्यक होती, परंतु काँग्रेसच्या खासदारांनी चर्चा होऊ दिली नसल्याचे खा. दानवे म्हणाले. भाजपप्रणीत आघाडी सरकार एकतर्फी विधेयक मंजूर करू शकली असती, परंतु संसदेच्या परंपरेला बाधा निर्माण होऊ दिली नाही.

काँग्रेसच्या काळातील टू जी स्पेक्ट्रम घोटाळा काेळसा घोटाळ्यावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे आेढले असून कॅगनेही दोषी ठरवले आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यावर कुणीच ठपका ठेवलेला नसताना काँग्रेस केवळ विरोधासाठी विरोध करीत आहे. याउलट बोफोर्स घोटाळ्यातील आरोपी क्वात्रोचीला मात्र काँग्रेसने देशातून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप त्यांनी लावला. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या २७ देशांच्या दौऱ्यात उद्योगांसाठी मोठे करार केले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूक वाढणार असून यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.

सरकारअसताना काय केले : पवारयांच्या मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यासंबंधी पत्रकारांनी विचारले असता खा. दानवे यांनी सरकार असताना यासंदर्भात पवाार यांनी पावले का उचलली नाहीत असा सवाल उपस्थित केला. केंद्रीय पथकाने पाहणी केली असून लवकरच पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्यासह आपण स्वत: दुष्काळी भागाचा दौरा करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी अतुल सावे यांचेही भाषण झाले. प्रवीण घुगे यांनी प्रास्तविक, तर शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांनी आभार मानले. निदर्शनात आ. नारायण कुचे, माजी आ. किशनचंद तनवाणी, भाजप कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, उपमहापौर प्रमोद राठोड, माजी नगरसेवक अनिल मकरिये, अॅड. माधुरी अदवंत, सविता कुलकर्णी, लता दलाल, दामुअण्णा शिंदे, मनपा स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, स्वीकृत सदस्य कचरू घोडके आदींची उपस्थिती होती.