औरंगाबाद - शिवसेनेवर कुरघोडी करत भाजपने शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३१ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणला आहे. मार्च अखेरपर्यंत काही रस्त्यांची कामे धडाक्यात सुरू करून त्याचा मनपा निवडणुकीच्या प्रचारात वापर करण्याचा भाजपचा मनसुबा आहे.
औरंगाबाद मनपाची निवडणूक एप्रिलच्या मध्यावर किंवा मे अखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यात युती करू नये, अशाच पद्धतीने भाजपची वाटचाल सुरू आहे आणि युती झालीच तर विकास कामात भाजप आघाडीवर असे चित्र निर्माण करण्याची तयारी महिन्याभरापूर्वीच झाली. त्यादृष्टीने डिसेंबरमध्ये फडणवीस औरंगाबादेत आले असताना त्यांना भाजपचे शिष्टमंडळ आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वात भेटले. शिवसेनेला बाजूला ठेवून आम्ही तुमच्याकडे प्रस्ताव देऊ. त्यास मंजुरी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार ५० कोटींची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते.
नागपूर अधिवेशनातच निधी मंजूर करावा, असाही स्थानिक पदाधिका-यांचा प्रयत्न होता. मात्र, फेब्रुवारीमध्ये निधीची तजवीज होऊ शकते, असे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी स्षष्ट केले होते. त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी पहिल्या टप्प्यात रस्त्यांसाठी ३१ कोटींचा निधी जाहीर केला. यावेळी ड्रेनेज, विद्युतीकरण, पाणी पुरवठा, उद्योग, शिक्षण आदी विषयांवर चर्चा झाली. रस्त्यांची कामे महापालिकेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच करावी. त्यात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिका-यांचा हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी विनंतीही करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शिष्टमंडळात आमदार सावे, माजी आमदार गोविंद केंद्रे, शहराध्यक्ष भगवान घडामोडे, माजी महापौर डॉ. भागवत कराड, अभिजित पटेल, चंद्रकांत हिवराळे यांचा समावेश होता.
पुढे वाचा... मनपाकडे काम देऊ नका