आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Central President Rajnathsing Visit Aurangabad And Jalna

पवारांनी पाठिंबा काढून घ्यावा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांचे मत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद/सिल्लोड - राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकार निधी देत नसेल,तर केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेण्यावर विचार करावा, असे मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी सोमवारी सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील दुष्काळी परिषदेत व्यक्त केले.
दुष्काळ निवारणासाठी निधी द्यावा यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांत भाजप आवाज उठवून सरकारवर दबाव आणील, तसेच महाराष्ट्रातील पक्षाचे विरोधी पक्षनेते विधिमंडळात आवाज उठवतील, अशी ग्वाहीही राजनाथ यांनी दिली.
दोनदिवसीय दुष्काळ पाहणी दौर्‍यास राजनाथ यांनी सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातून प्रारंभ केला. राजे संभाजी कारखान्याजवळील चारा छावणी, पिंप्री (राजा), करमाड, लाडसावंगी आणि नंतर भाकरवाडी येथे पाहणी करून त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशीही वार्तालाप केला. स्वातंत्र्यानंतरच्या 65 वर्षात 50 वर्षे काँग्रेसचे राज्य आहे. या काळात ते देशाची आर्थिक स्थितीही सुधारू शकले नाहीत. आपल्या सोबत स्वतंत्र झालेल्या अनेक देशांनी प्रगतीची शिखरे गाठली. आपण मागेच राहिलो. यासाठी काँग्रेसच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी निल्लोड येथे केला. या वेळी पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस श्याम जाजू, माधव भंडारी, खासदार रावसाहेब दानवे, आमदार पंकजा पालवे, पूनम महाजन, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष भगवान घडामोडे, शहराचे उपमहापौर संजय जोशी यांची उपस्थिती होती.

राजनाथ यांच्या मागण्या
- यंदाचे पूर्ण कर्ज माफ करण्यात यावे.
- यापुढे बिनव्याजी कर्ज देण्यात यावे,
- यंदापासून दोन वर्षे बी-बियाणे मोफत द्यावेत.
- मनरेगाची व्याप्ती वाढवण्यात यावी
- एकरी किमान उत्पन्न निश्चित करून विमा काढावा. नंतर त्याच दराने भरपाई देण्यात यावी.

पंतप्रधानांनी पाहणी करावी
कोणत्याही पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आला नाही, असे पिंप्री ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर स्वत: पंतप्रधानांनी पाहणी करावी, अशी सूचना राजनाथ यांनी केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही आपण पत्र लिहू, असेही त्यांनी सांगितले.

गैरव्यवहार रोखण्यासाठी समिती नेमा
केंद्राच्या मदतीत गैरव्यवहार होऊ शकतो. त्यावर निगरानी ठेवण्यासाठी समिती गठित करण्यात यावी, त्यात विरोधी पक्षातील नेत्यांचाही समावेश असावा, अशी सूचना राजनाथ यांनी केली. सिंचन घोटाळा झाला नसता तर दुष्काळाचे चित्र वेगळे असले असते असेही राजनाथ म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष दोन दिवसांत
भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाचे नाव निश्चित झाले असून दोन दिवसांत घोषणा होईल, असे राजनाथ यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांनी हे नाव निश्चित केले असल्याचेही सांगून नाव उघड करण्यास त्यांनी नकार दिला. गडकरी, मुंडे यांनीच नवीन अध्यक्ष ठरवला असल्याने याबाबतचा वाद निरर्थक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंडे यांचा उपोषणाचा इशारा
चारा छावण्या सुरू होऊन दोन महिने लोटले तरी पैसे मिळालेले नाहीत. येत्या रविवारपर्यंत पैसे मिळाले नाही तर सोमवारपासून विभागीय आयुक्तालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा गोपीनाथ मुंडे यांनी दिला. मुंडे यांचे उपोषण लांबले तर मी दिल्लीत न राहता उपोषणाला बसेन, असे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.