आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला न.प.चे कोडे, शिवसेनेला मात्र दुष्काळाचे गांभीर्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीत प्रमुख सत्ताधारी भाजप हा तिसऱ्या क्रमांकावर राहणार असल्याचे पोलिसांच्या अहवालात समोर आल्यापासून भाजप अस्वस्थ झाला असून या निवडणुका कशा जिंकता येतील याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे शिवसेना मात्र नगर परिषदांचे नंतर बघू, आधी दुष्काळावर कशी मात करता येईल याचा विचार करत आहे.

शिवसेनेचे मंत्री गुरुवारी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना झाले असून पालकमंत्री रामदास कदम हे शुक्रवारी जिल्ह्याच्या काही भागांचा दौरा करणार आहेत. ‘मातोश्री’च्या आदेशावरून राज्याच्या अन्य भागांतील आमदारही मराठवाड्यात दाखल झाले असून प्रत्येक मतदारसंघात एक आमदार तळ ठोकून आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही असे आमदार गुरुवारी रात्रीच दाखल झाले. दिवसभर शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ही मंडळी शुक्रवारी दुपारी वाजता येथील सुभेदारी विश्रामगृहावर एकत्रितपणे चर्चा करणार असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी भविष्यात काय करण्याची गरज आहे हे या वेळी ठरवले जाईल.

प्रारंभी जोरदार पाऊस झाल्यानंतर अख्ख्या ऑगस्ट महिन्यात पावसाने मराठवाड्यावर डोळे वटारले होते. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट निर्माण झाले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मदतीची गरज निर्माण झाल्याचे काही सेना नेत्यांनी वरिष्ठांना कळवले. त्यानंतर मंत्री तसेच आमदारांचा दौरा निश्चित करण्यात आला होता. गतवर्षी करण्यात आलेल्या मदतीचे काय परिणाम झाले हे जाणून घेण्याबरोबरच पुढे काय मदत करायची यासाठी हा दौरा निश्चित करण्यात आला. शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत असताना भाजपला मात्र मराठवाड्यातील नियोजित नगर परिषदांचे निवडणुकांचे पडले आहे. यात भाजपचा दारुण पराभव होणार असल्याचा अहवाल पोलिसांच्या गुप्तचर विभागाने दिल्याने ही मंडळी अस्वस्थ झाली आहे. दुष्काळाची त्यांनी अजिबात चिंता नसल्याचे दिसते. गत रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत येऊन संघटनात्मक बैठक घेतली. त्यात कोणत्याही परिस्थितीत नगर परिषदा जिंकायच्याच असे सांगताना त्यासाठी वाट्टेल ते करा, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. त्यावरून भाजपला नगर परिषदांतील विजयाचे पडले आहे, तर शिवसेना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावली आहे.

सुभेदारीवर बैठक
सुभेदारीविश्रामगृहावर होणाऱ्या मंत्री, आमदार तसेच खासदारांच्या बैठकीत नगर परिषद निवडणुकीवर चर्चा होणार का, असा प्रश्न जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना केला असता शिवसेना ही कायम निवडणुकीसाठी सज्ज असते. त्यासाठी वेगळी बैठक घेण्याची गरज नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सध्या कशाची गरज आहे, त्यांच्यासाठी काय केले पाहिजे यावर आम्ही चर्चा करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोठे आहे दुष्काळ ?
दरम्यान,गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मराठवाड्यात आता दुष्काळ कोठे आहे, असा सवाल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केला. महिनाभराचा गॅप पडला असला तरी आता सर्वत्र चांगले चित्र असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेना कशासाठी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहे? असे विचारल्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला अन् कोणत्याही परिस्थितीत भाजप नगर परिषदांवर विजय मिळवणार, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...