आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप नगरसेवकांचा उपोषणाचा इशारा, बहुतांश वार्डात विकास कामे होत नसल्याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ठप्प झालेली विकास कामे, पाणीपुरवठ्यातील गोंधळ किरकोळ कामेही होत नसल्याने आता सत्ताधारी भाजपनेच थेट प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. भाजपच्या नगरसेवकांनी या विषयावर थेट उपोषणाचाच इशारा दिला आहे. या आंदोलनात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली आहे.

गेल्या आठवड्यातील सर्वसाधारण सभेत आयुक्त विरुद्ध नगरसेवक अशी लढाई सुरू झाली. निवडून येऊन दीड वर्ष उलटले पण विकास कामांचा पत्ता नाही, कचरा उचलणे, किरकोळ देखभाल-दुरुस्ती, पथदिवे, धूर फवारणी यासारखीही कामे होत नाहीत. शिवाय जायकवाडीचे धरण ६५ टक्के भरूनही पाण्याची शहरात असलेली बोंब या कारणावरून आता नगरसेवकांनी थेट प्रशासनालाच भिडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सत्तेत धाकटा भाऊ असलेल्या भाजपने पुढाकार घेतला आहे.

आज भाजपच्या नगरसेवकांनी खासकरून नगरसेविकांनी मनपा आयुक्तांना निवेदन देत आपले प्रश्न मार्गी लागल्यास मनपासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. माधुरी अदवंत, सत्यभामा शिंदे, मनीषा मुंडे, ज्योती नाडे, राज वानखेडे यांनी आज आपापल्या वाॅर्डांतील कामांबाबत उपोषणाचा इशारा दिला. तिकडे या आंदोलनात काँग्रेसनेही उडी घेतली असून काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांनीही या विषयावर उपोषणाचा इशारा दिला. राष्ट्रवादीच्या नगरसेविका अंकिता विधाते दुर्गंधीयुक्त पाण्याची बाटली घेऊन आल्या होत्या.

एमआयएम आणि शिवसेना काठावरच
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आंदोलनाच्या पवित्र्यात असताना शिवसेना एमआयएम मात्र काठावर बसून पाहत आहेत. याबाबत महापौर त्र्यंबक तुपे म्हणाले की, हे प्रश्न केवळ भाजपच्याच नगरसेवकांचेच आहेत असे नाही. सर्वच पक्षांचे नगरसेवक त्या स्थितीतून जात आहेत. आपण नगरसेवकांसोबतच आहोत, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...