आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘समांतर’चे संचालक, उपअभियंत्यावर गुन्हा, नगरसेवकांचे पाण्याच्या टाकीवर चार तास आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने संतापलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी बुधवारी एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर सकाळी साडेसात वाजेपासून चार तास ठिय्या आंदोलन केले. संबंधित कर्मचाऱ्यांनी पाणी साेडण्याच्या वेळेबाबत तसेच दूषित पाण्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांत चांगलीच बाचाबाची झाली. दरम्यान, अनियमित दूषित पाणीपुरवठा केल्याबद्दल मनपा प्रशासनाच्या तक्रारीवरून कंपनीचे संचालक, उपअभियंत्यासह तिघांवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडील समांतर रद्दचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने घेऊन तशी नोटीसही कंपनीला देण्यात आली. कंपनीने न्यायालयात धाव घेतल्याने हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे तूर्तास शहरातील पाणीपुरवठा करण्याचे काम आजही कंपनी करत आहे. मात्र मनपा आम्ही पाणीपुरवठा दुरुस्तीचे काम करत असल्याचे सांगत आहे. मात्र त्यानंतरही नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही. शहरातील अनेक वॉर्डांना दूषित पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने भाजपच्या नगरसेवकांनी सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर बुधवारी सकाळी साडेसातपासून चार तास ठिय्या दिला. सिटी वॉटर युटिलिटीचा एकही अधिकारी तेथे हजर झाला नाही. यामुळे नगरसेवक आणखीनच खवळले होते. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी िसडकोतील नगरसेवकांनी मंगळवारी आयुक्त तसेच महापौरांकडे निवेदन दिले होते. पाणीप्रश्न सोडवला नाही तर उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला होता. या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी वॉर्डात नळांना वेळेवर पाणी आल्याने नगरसेवक खवळले होते. उन्हाळ्यात जायकवाडी धरणात पाणी नसल्याचे कारण होते. मात्र, आता धरणात ७० टक्के जलसाठा उपलब्ध असूनही वॉर्डात पाणी का येत नाही, अशी विचारणा करत नागरिकांनी आम्हाला वैतागून सोडले अाहे. आता आमचा संयम सुटला आहे. कंपनी पालिकेच्या वादात शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वेठीस धरले जात अाहे, असा आरोप नगरसेवकांनी केला.

मनपाच्या अधिकाऱ्यांना घेराव : नगरसेवकांनीशहर अभियंत्याशी संपर्क केल्यानंतर पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल, उपअभियंता अमजद ख्वाजा दाखल झाले. चहेल यांना घेराव घालत नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डातील तक्रारी त्यांच्याकडे मांडल्या. पाणीपुरवठा सुरू असताना तो मध्येच थांबवला जातो. नियमित पाणीपुरवठा होत नाही, दूषित पाणी येत असून नागरिक त्यामुळे साथरोगांना बळी पडत आहेत. सणासुदीचे दिवस असल्याने पालिकेने पाणीपुरवठा तरी सुरळीत करावा, अशी मागणी करत नगरसेवकांनी घोषणाबाजी केली.

कंपनीवर गुन्हा दाखल
पाणीही अत्यावश्यक सेवा पुरवण्याऐवजी नागरिकांना वेठीस धरणे आणि दूषित पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्याप्रकरणी मनपाचे उपअभियंता अमजद ख्वाजा, कंपनीचे संचालक सुशील शेट्टी वृषभ मार्तंड यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात कलम २६९ २७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या वेळी दूषित पाण्याचे नमुनेही पोलिस ठाण्यात देण्यात आले.

यांनी दिला ठिय्या
यावेळी उपमहापौर प्रमोद राठोड, भगवान घडामोडे, शिवाजी दांडगे, नितीन चित्ते, अॅड. माधुरी अदवंत, शोभा वळसे, राज वानखेडे, पुष्पा रोजतकर, बालाजी मुंडे, दामूअण्णा शिंदे, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, अनिल साळवे यांच्यासह नागरिकांनी सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले.
बातम्या आणखी आहेत...