आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पातील किरकोळ तरतुदीवरून भाजपत संताप, बड्यांच्या वाॅर्डात कोट्यवधीची कामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कालच सादर झालेल्या अर्थसंकल्पात प्रशासनाने काही बड्यांच्या वाॅर्डात कोट्यवधींची कामे टाकताना बाकीच्या वाॅर्डांत किरकोळ तरतूद केल्याने भाजपचे नगरसेवक भडकले असून त्यांनी थेट शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्याकडे धाव घेत तक्रारी केल्या. त्यामुळे आज महापालिकेत एन्ट्री घेत तनवाणी यांनी नगरसेवकांची बैठक घेतली नंतर अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना चांगलेच फैलावर घेतले. शेवटी अधिकाऱ्यांनी उद्याच्या दिवसांत अर्थसंकल्पात सुधारणा कराव्यात त्या १९ तारखेला होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत त्या मांडाव्यात अशा सूचना सभापती दिलीप थोरात यांनी दिल्या.

काल आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी प्रशासनाने तयार केलेला ७७७ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. या अर्थसंकल्पाच्या वैशिष्ट्यांचे कौतुक होत असताना वाॅर्डनिहाय केलेल्या तरतुदी मात्र वादाचे कारण ठरल्या आहेत. त्यात ११३ पैकी फक्त १८ वाॅर्डांनाच भरघोस निधी दिल्याचे समोर येताच या नगरसेवकांच्या संतापाचा बांधच फुटला. भाजपच्या नगरसेवकांनी सभापती दिलीप थोरात यांच्याकडे तक्रारी केल्या तर काहींनी थेट शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्याकडे धाव घेतली. या बजेटच्या निमित्ताने आज तनवाणी यांनी महापालिकेत एन्ट्री केली. दुपारी त्यांनी भाजपच्या मित्र गटाच्या नगरसेवकांची बैठक बोलावली. त्यात जवळपास सर्वच नगरसेवकांनी बजेटवर ताशेरे ओढत मोजक्याच नगरसेवकांना झुकते माप दिल्याचे सांगितले.

घोडेलेंना सव्वा कोटी, तर खैरेंना ८० लाख
भाजपच्यानगरसेवकांची बैठक असताना काँग्रेसचे नगरसेवक अफसरखान या बजेटबाबत तक्रार करायला स्थायी समिती सभापतींकडे आले होते. तेही बैठकीत सहभागी झाले त्यांनी तर कोणत्या वाॅर्डाला किती दिले याची यादीच सांगितली. त्यात नंदकुमार घोडेले यांच्या इटखेडा वाॅर्डासाठी कोटी २० लाख रुपये, ऋषीकेश खैरे यांच्या समर्थनगर वाॅर्डासाठी ८० लाख, विमल कांबळे यांच्या कांचनवाडी वाॅर्डासाठी कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र भाजपचे राजू शिंदे यांच्या एमआयडीसी वाॅर्डासाठी फक्त लाख रुपये तरतूद ठेवण्यात आली आहे. मागील वर्षात एकही काम करता आले नाही. आता वेळेवर अर्थसंकल्प झाल्यावर सर्वच वाॅर्डांना समान वाटप करून विकासकामांना चालना देण्याऐवजी भेदभाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

प्रशासनावर ठपका
अधिकाऱ्यांचीबैठक घेऊन सभापती थोरात तनवाणी यांनी त्यांना धारेवर धरले. ही प्रशासनाची चूक असून त्यांनी ती आता सुधारली पाहिजे असे सांगत येत्या १९ तारखेला बजेट फायनल करण्यापूर्व उद्याच बजेटमध्ये सुधारणा करा असे निर्देश त्यांनी दिले.

दबाव कुणाचा सांगता येत नाही
पत्रकारांशी बोलताना तनवाणी म्हणाले की, प्रशासनाने दुजाभाव केला असून त्यांनीच त्यात दुरुस्ती केली पाहिजे. सभापती थोरात म्हणाले की, बजेटबाबत केवळ भाजपमध्येच नाराजी आहे असे नाही तर सर्वच पक्षांचे नगरसेवक नाराज आहेत. त्यामुळेच आम्ही बैठक घेतली.