आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप जिल्हाध्यक्षांना पक्षाकडून चारचाकी भेट, पहिल्या टप्प्यात खरेदी केल्या २१ स्कॉर्पिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सत्तेचा लाभ पदाधिकारी, कार्यकर्त्यांपर्यंत आला नाही, अशी ओरड भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. मात्र, यातील काहींचा हा रोष कमी होईल. याचे कारण म्हणजे पक्षाकडून जिल्हा व शहराध्यक्षांना प्रत्येकी एक स्कॉर्पिओ दिली जाणार आहे. शनिवारी कोजागरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर पक्षाने २१ चारचाकी खरेदी केल्या असून राजूर येथे विधिवत पूजनानंतर या मोटारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्षांकडे सोपवण्यात आल्या. दरम्यान, सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मोटारी देणे हा त्याचाच एक भाग असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे.
यापूर्वी सत्तेत असताना १९९९ मध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष, अन्य काही पदाधिकारी तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत उमेदवारांना सफारी, बोलेरो अशा मोटारी देण्यात आल्या होत्या. मधल्या काळात मात्र तसे झाले नाही. सत्ता आल्यानंतर दोन वर्षांनी या मोटारी देण्यात आल्या. प्रत्येक जिल्हाध्यक्षांना मोटारी दिल्या जाणार असून आजचा हा पहिला टप्पा होता. औरंगाबादेत येथे या मोटारींची खरेदी झाली. त्यानंतर या मोटारी राजूरकडे रवाना झाल्या. तेथे पूजनानंतर २१ जिल्हाध्यक्षांकडे या मोटारी सुपूर्द करण्यात आल्या. प्रत्येक जिल्हाध्यक्षाने त्यांच्या नावे मोटारींची आरटीओकडे नोंदणी करायची आहे. कालावधी संपल्यानंतर या मोटारी नंतरच्या नियुक्त अध्यक्षाकडे सोपवल्या जातील. वापराच्या काळातील इंधन, चालकाचा खर्च पदाधिकाऱ्यांना करावा लागणार आहे.

शहराध्यक्षांनाही मोटारी
शहराध्यक्षांना मोटारी दिल्या जातील. या निमित्ताने जवळपास १०० मोटारी खरेदी केल्या जातील. यापूर्वीही पक्षाकडून असा निर्णय घेण्यात आला होता. लवकरच सर्व जिल्हाध्यक्षांना अशा मोटारी दिल्या जातील, हा सत्तेचा लाभ नव्हे तर संघटनेचे काम गतीने करता यावे, यासाठीचा हा पक्षनिर्णय असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी या वेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...