आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Election War Room News In Marathi, Voters, Aurangabad, Divya Marathi

भाजप ‘वॉर रूम’मधून रोज दहा हजार मतदारांशी संवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एकाच वेळी पन्नास जण हेडफोन लावून बोलत आहेत. कोणी नागपूरच्या व्यक्तीला तर कोणी थेट मुंबईत संवाद साधत आहेत. राज्यातील कोणत्याही भागात एकाच वेळी 50 जण रोज किमान दहा हजार लोकांना निवडणुकीसाठी सतर्क करत आहेत. हे चित्र आहे भाजपच्या वॉर रूममधील. राज्यातील बूथ कार्यकर्त्यांचे इलेक्शन मॅनेजमेंटचे काम औरंगाबादमधून केले जात आहे.
निवडणुकीच्या काळात प्रचारामध्ये बूथवरचा व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावत असतो. भाजपने सहा महिन्यांपासून त्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या, माजी महापौर विजया रहाटकर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यातल्या सर्व लोकसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांचा डाटा जमा करण्याचे काम या वॉर रूमच्या माध्यमातून केले जात आहे.
रोज दहा हजार लोकांशी संवाद : या हायटेक रूममध्ये 50 जण काम करतात. दररोज जवळपास 12 तास हे काम चालते. यामध्ये बूथ कार्यकर्त्यांसोबत युवक-युवती संवाद साधतात. यामध्ये ऑटो डायलच्या माध्यमातून आपोआप कॉल लावला जातो. सीआरएम सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ज्या बूथप्रमुखाला कॉल लावला त्याची सर्व माहिती स्क्रीनवर येते. त्यानुसार त्या व्यक्तीशी संवाद साधला जातो. यामध्ये बूथप्रमुख पक्षाच्या प्रचाराचे काम कसे सुरू आहे इथपासून सर्व सूचना दिल्या जातात. एखाद्या वेळी बूथप्रमुखांना कॉल न लागल्यास अशा बूथ कार्यकर्त्यांची वेगळी यादी देखील तयार होते. राज्यात एका बूथवर एक बूथप्रमुख आणि दहा कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली.
मोदींच्या सभेला 12 हजार कॉल्स
मोदींच्या सभेला गर्दी व्हावी यासाठी याच वॉर रूममधून लोकांना प्रोत्साहित केले जाते. ज्या दिवशी सभा असते त्या वेळेस किमान 12 ते 14 हजार कॉल्समधून निरोप देण्यात येतात.
48 मतदारसंघांचा डाटा तयार
या वॉर रूममध्ये 48 लोकसभा मतदारसंघांचा डाटा तयार आहे. भाजपने राज्यात एका बूथवर बूथप्रमुख आणि दहा सदस्यांची नियुक्ती केली आहे. राज्यात 89435 बूथप्रमुख नेमण्यात आले आहेत. यामध्ये भाजप लढवत असलेल्या 24 लोकसभा मतदारसंघात 44195 बूथप्रमुख शिवसेनेच्या 37183 आणि इतर चार जागांसाठी 5075 बूथप्रमुख नेमण्यात आले आहेत. यामध्ये बूथप्रमुख तसेच सदस्यांचा नाव पत्ता, मोबाइल नंबर असा सर्व डाटा तयार ठेवण्यात आला आहे.