आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षपूर्तीसाठी भाजप नेते सरसावले; कार्यकर्ते नाराजच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होऊन ३१ ऑक्टोबर रोजी वर्ष पूर्ण होत आहे. तेव्हा शिवसेना सरकारमध्ये नव्हती. त्यामुळे या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमापासून हा मित्रपक्ष दूरच राहणार हे नक्की असले तरी भाजपच्याच कार्यकर्त्यांना यात फारसा उत्साह नसल्याचे समोर येत आहे. दरम्यान, मोजक्याच लोकांना सत्ता मिळाली, असा थेट आरोपही भाजपच्याच कार्यकर्त्यांकडून खासगी चर्चेदरम्यान कानी येत आहे.
सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पक्षाच्या वतीने प्रत्येक मतदारसंघात जंगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्याच्या तयारीसाठी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. या बैठकीला राज्यातील सर्व आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी जिल्हा तसेच शहराध्यक्ष उपस्थित होते.
वर्षभरात राज्य सरकारने केलेली कामे, समोर आणलेल्या विविध योजना याची माहिती गावोगाव पोहोचवायची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपवण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी एकेका मंत्र्याकडे दिली जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्याची जबाबदारी कोणत्या मंत्र्यावर असेल हे शुक्रवारी स्पष्ट होईल. जबाबदारी सोपवण्यात आलेल्या मंत्र्याने १९ ३१ ऑक्टोबर या कालावधीत किमान चार दिवस त्या-त्या जिल्ह्यात थांबणे अनिवार्य असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक तरी मोठा कार्यक्रम घेतला जाणार आहे.

इथेही "डिफरन्स'
आम्ही फक्त नियोजनच करायचे का ?

मोठ्याकार्यक्रमाची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपवण्यात येत असतानाच कार्यकर्ते मात्र हिरमुसले आहेत. सत्ता आली तरी आपण जबाबदारी खांद्यावर घेऊन फक्त कार्यक्रमांचेच नियोजन करायचे का, असा सवाल यातील काहींनी केला. ही बैठक होत असताना महामंडळांच्या नियुक्त्यांचे काय झाले, असा सवाल उपस्थित करण्यात यावा, अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदार तसेच प्रदेश कार्यकारिणीवरील नेत्यांकडे केली होती. बैठक संपल्यानंतर विचारणा केली असता महामंडळांचा विषय निघालाच नाही, वर्षपूर्तीनंतर निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आल्याने ही मंडळी हिरमुसली आहेत.

जिल्हाभरात कार्यक्रम पण उत्साहाबाबत शंकाच
सत्तास्थापन झाली तेव्हा शिवसेना सोबत नव्हती. त्यामुळे वर्षपूर्तीच्या कार्यक्रमांवर सेनेचा बहिष्कार असेल हे नक्की आहे तर दुसरीकडे भाजपचेच कार्यकर्ते समाधानी नसल्यामुळे सत्ता वर्षपूर्तीच्या कार्यक्रमांत कितपत उत्साह दिसेल, यावर अनेकांना शंका आहे.
कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळेल का, याचीही चिंता आहे. पुढील महिनाभर जिल्ह्यात सर्वत्र वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार असून त्याचे नियोजन उद्या जाहीर होईल. त्याच्या तयारीसाठी गुरुवारी मुंबईत बैठक होती. त्यात अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा झाली नाही, असे आमदार अतुल सावे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...