आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप सीएमना साकडे घालणार, सेनेची दादागिरी झोंबली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- समांतर जलवाहिनीमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि पाइप खरेदीबाबतच्या प्रस्तावावर शिवसेनेने केलेली दादागिरी भाजपला झोंबली असून सेनेने मंजूर करून घेतलेला ठराव विखंडित करावा, अशी मागणी करण्यासाठी मुंबईत गेलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांची मंगळवारी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली नाही. बुधवारी सकाळी ११ वाजता आता ही बैठक होणार असून त्यावर सेना भाजपमधील संबंध अवलंबून आहेत.
समांतर जलवाहिनी हा शिवसेनेने अस्मितेचा प्रश्न बनवला असताना समांतरला विरोध हा भाजपने अस्मितेचा विषय केला आहे. समांतरवरूनच शिवसेनेवर दबाव टाकून मनपात राजकारण करता येईल, अशी खात्री झाल्यावर भाजपने आपली रणनीती थेट ठेवली आहे. पाणी पुरवठ्याचे तीन तेरा वाजताच भाजपने तो विषय लावून धरीत सेनेची अडचण केली. पाठोपाठ डीआय पाइपचा निर्णय झाला असताना चक्क गुपचूप तो एचडीपीई पाइप वापराचा निर्णय घेण्यात आला. शनिवारच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय मागे घ्यायला लावण्याची भाजपची रणनीती होती, पण शिवसेनेने तो हाणून पाडत ठराव मंजूर करून घेतला. त्याला प्रत्युत्तर देत भाजपने आपल्या हक्काच्या मैदानात म्हणजे स्थायी समितीत फक्त डीआय पाइपच वापरा असा ठराव मंजूर करून घेतला. त्याच दिवशी पालकमंत्री रामदास कदम यांनी भाजपला समांतरला आडवे याल तर आडवे करू, अशी भाषा वापरल्याने भाजपचे पित्त खवळले आहे.
त्यामुळे भाजपचे पदाधिकारी गटनेते भगवान घडामोडे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभापती दिलीप थोरात, शिरीष बोराळकर आदी मुंबईला रवाना झाली.
शिवसेनेचा ठराव विखंडित करण्याची मागणी
मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खाते असल्याने त्यांना भेटून सगळा घटनाक्रम सांगून शिवसेनेचा ठराव विखंडित करण्याची मागणी करण्याचे भाजपने ठरवले आहे. आज त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट होणार होती. पण ती झाली नाही. बुधवारी सकाळी ११ वाजता भेट होणार असून त्यात चर्चा होईल. या भेटीनंतरच शिवसेना भाजपमधील मनपास्तरावरील संबंध कसे राहतील हे स्पष्ट होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...