आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Issue For The Post Of President In Aurangabad

शहराध्यक्षपदासाठी चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाचे नवे शहराध्यक्ष ठरवण्यावरून पक्षात सुरू झालेल्या वादावार शुक्रवारी येथील एका पंचतारांकीत हॉटेलात पडदा पडला. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या विरोधी गटात अखेर एकमत झाले असून सोमवारी पक्ष निरीक्षकाच्या उपस्थितीत बैठक बोलावून नवे शहराध्यक्ष जाहीर केले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी स्पष्ट केले. विरोध बाजुला ठेवून पक्ष हितासाठी अखेर सर्वांनीच शहराची सुत्रे तनवाणी यांच्याकडे देण्याचे मान्य केल्याचे समजते. परंतु यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

पक्षाच्या वतीने गुरुवारी शहराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याचे ठरवले होते. परंतु पक्षात दोन मतप्रवाह झाले तसेच थेट वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत वादावादी झाल्याने रात्री उशिरा ऐनवेळी ही निवडणूक रद्द करण्यात आली. त्यामुळे पक्षात वेगळीच चर्चा सुरू झाली होती. गुरुवारी दुपारी जालन्यात प्रदेशाध्यक्ष तसेच पक्षनिरीक्षक सुरेश देशमुख यांच्या उपस्थितीत जालना येथे तीन तास काथ्याकुट झाला. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष दानवे, आमदार अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, मावळते शहराध्यक्ष भगवान घडामोडे, माजी महापौर डॉ. भागवत कराड, माजी उपमहापौर संजय जोशी, स्थायी समिती दिलीप थोरात यांच्यासह शहरातील काही पदाधिकारी सकाळच्या सत्रात पुन्हा एकदा चर्चेसाठी जालना रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलात एकत्र आले. तेथे दोन तासांच्या चर्चेनंतर एकदाचे एका नावावर मतैक्य झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. परंतु अंतिम निर्णय झाला नाही. प्रदेशाध्यक्ष काय ते शेवटचे ठरवतील, असे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी अधिकृतपणे सांगितले. दरम्यान दुसरीकडे तनवाणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त भाजपच्या वर्तुळात चर्चेत आहेे.

अजून निर्णयच नाही, वाद कसा होईल
^अजून कोणताही निर्णय झालेला नाही. अध्यक्ष कोण होणार यावर विचारमंथन सूरू आहे. श्रेष्ठी निर्णय घेतील. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे योग्य वेळी निर्णय जाहीर करतील. वाद झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले, ते खरे नव्हे. अजून निर्णयच झाला नसेल तर वाद कसा होईल? -शिरीष बोराळकर, प्रदेशप्रवक्ते.

किशनचंद तनवाणींच्या पतंगबाजीत सर्वच
तनवाणीयांच्या वतीने दरवर्षी गुलमंडीवर पतंगमहोत्सव आयोजित करण्यात येतो. यात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते तसेच त्यांचा मित्र परिवार सहभागी होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार सावे, डॉ. कराड, घडामोडे या मंडळींनी येथे हजेरी लावली. शहराध्यक्षपदाचा वाद सुरू असल्याने ही मंडळी या वेळी येते की नाही, याकडे भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.