आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leader Amit Shah And Chandrakant Khaire Discus Issue At Aurangabad

शहांच्या भेटीत शिवसेना-भाजपची धार्मिक युती!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नरेंद्र मोदी असोत की त्यांच्या सरकारातले मंत्री किंवा थेट अमित शहा, दौलताबाद घाटाच्या पायथ्याशी असलेल्या दक्षिणमुखी मारुतीवर गुजरातच्या भाजप नेत्यांची श्रद्धा असून आपणही याचे भक्त आहोत असे सांगत शनिवारी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या पूजेचा सारा जिम्मा आपणच उचलला होता, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले. शिवसेना आणि भाजपची ही धार्मिक युती असली तरी राज्यातील सत्तेसाठी युती करण्याच्या सकारात्मक हालचाली सुरू झाल्याचे संकेतही त्यांनी दिले.

निवडणुकांपासून सुरू झालेले शिवसेना भाजपमधील वितुष्ट टोकाला पोहोचले असताना अमित शहांच्या या दौऱ्यात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी दोन्ही दिवस शहा यांना दिलेली सोबत हा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. शनिवारी शहा यांनी खासदार खैरे यांच्यासोबत दौलताबाद घाटाच्या पायथ्याशी असलेल्या दक्षिणमुखी मारुतीचे दर्शन घेतले यथासांग पूजाही केली.

आज पत्रकार परिषदेत खैरे यांना कालच्या दर्शनामागचे गौडबंगाल काय, असे विचारले असता त्यांनी गुजरात भाजपच्या नेत्यांना पावणाऱ्या या मारुतीबाबत रंजक माहितीही पत्रकारांना दिली. ते म्हणाले, हे दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर गुजरातेत प्रसिद्ध आहे. खासकरून तेथील भाजप नेत्यांना चांगला अनुभव आल्याने तेथील नेत्यांची कायम ये-जा असते. गोध्रा प्रकरणानंतर नरेंद्र मोदी अडचणीत आले असताना आपणही या देवळात पूजा केली होती. गुजरातेतील विधानसभेच्या दोन्ही निवडणुकांच्या वेळीही गुजरातमधील अनेक मंत्री, नेते येथे येऊन ४५ दिवसांची पूजा करून गेले. अमित शहाही भक्त असून त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा पोलिसांनी लावला होता तेव्हापासून तेही येथे दर्शनाला येतात. आतापर्यंत पाच सहा वेळा ते येऊन गेले आहेत. दिल्लीतील भेटीतही त्यांच्यासोबत दर्शनाचा विषय निघत असतो, तो या वेळीही निघाला होता, योगायोगाने तो आता जुळून आला.
भाजप राष्ट्रीय अध्यक्षांनी केलेल्या पूजेचा जिम्मा खैरेंनी उचलला
शिवसेनेने पडद्याआडून सत्तेत सहभागी होण्याबाबत वाटाघाटी सुरू असल्याचे संकेत खैरे यांनी दिले. ते म्हणाले, शिवसेना सध्या प्रखर विरोधी पक्ष असून सत्तेत असलो नसलो तरी आक्रमकपणे भांडू असे म्हटले. सध्यातरी म्हणजे काय असे विचारले असता त्यांनी सत्तेत शिवसेनेला सहभागी करून घेण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगत सरसंघचालकांच्या मध्यस्थीतून काही तरी चांगले होईलच, अशी आशा व्यक्त केली.