आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुसफूस: मानासाठी भांडाल तर सत्ता मिळणार नाही; मुंडेंच्या कानपिचक्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पक्षात मला सन्मानच मिळत नाही, कोणतीही जबाबदारी दिली नाही, बैठकीचे निमंत्रण मिळत नाही, त्यामुळे मी काय काम करू, असा ट्रेंड भारतीय जनता पक्षात फोफावला आहे, अशा शब्दांत घरचा आहेर देत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी आज कार्यकर्त्यांना जाहीरपणे फटकारले. सत्तेच्या मार्गावर अशा गोष्टींना थारा नसतो. मान-सन्मानावरून असेच एकमेकांशी भांडत राहाल तर आपल्याला कधीच सत्ता मिळणार नाही. त्यामुळे धुसफूस विसरून शिवसेना, रिपाइं आदी मित्रपक्षांना सोबत घेऊन विजयी मार्गावर निघा, असा सल्लाही त्यांनी दिला.

संत एकनाथ रंगमंदिरात मंगळवारी (9 जुलै) भाजपच्या विभागीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, तर माजी मंत्री हरिभाऊ बागडे, खासदार रावसाहेब दानवे, युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा पंकजा पालवे, प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारे उपस्थित होते.

मुंडेंच्या मते काय आहे ‘ट्रेंड’ : काय काम केले, अशी विचारणा केल्यावर अनेक कार्यकर्ते माझ्याकडे पदच नसल्याने मी काय काम करू, असे उत्तर देतात. बैठकीसाठीही त्यांना निमंत्रण हवे असते. निमंत्रण मिळाले नाही तर बैठकीला कसे येणार, असा त्यांचा प्रतिप्रश्न असतो.

सर्वात गंभीर म्हणजे बैठक घ्यायची असेल तर आधी पैसे द्या, अशीही मागणी केली जाते. ठराविक लोकांनाच पदे वाटली जातात. ज्यांना पद मिळाले त्यांनीच काम करावे, असाही सूर वाढत चालला आहे.

आता देवेंद्रजी आणि पंकजाजी!
आपला जिल्हाध्यक्ष शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाशी बोलत नाही. रिपाइंचा जिल्हाध्यक्ष कोण हेही त्याला माहिती नसते. हे चुकीचे आहे. महायुतीत प्रत्येकाला ज्याचा त्याचा मान दिला पाहिजे, असे मुंडेंनी स्पष्ट केले. स्वत:चे उदाहरण सांगताना ते म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून मी देवेंद्र यांना देवेंद्रजी म्हणतो. युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष झाल्याने पंकजा यांनाही मी आता पंकजाजी म्हणतो. कारण पक्ष म्हणून ही पदे मोठी आहेत.

मुंबई, दिल्ली काबीज करण्यासाठी मुंडेंचे सल्ले

>निर्धार करा : पक्षाच्या आदेशाची प्रतीक्षा करू नका. पक्ष माझा आहे. त्यामुळे मी लगेच कामाला लागेन, असा निर्धार करा. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

>प्रश्न विचारू नका : पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, मनसेसोबत युती होईल की नाही, असले प्रश्न विचारू नका. बहुमत मिळाल्याशिवाय पंतप्रधान होणार नाही. आधी सत्ता, नंतर पंतप्रधान ठरेल.

>मित्रांसोबत मैत्री करा : केवळ भाजपचे नव्हे तर मित्रपक्ष शिवसेना, रिपाइंचे उमेदवार विजयी झाले तरच सत्ता मिळेल. त्यामुळे त्यांच्यासाठीही जीवतोड मेहनत करा. जनता, महायुती आणि संघटनेसाठी आपण काम करतो, याचे भान ठेवा.

>मानापानात अडकू नका : बैठक हा पक्षाचा धर्म आहे आणि तो निष्ठेने पाळला गेला पाहिजे. त्यामुळे मानापानात अडकू नका. पक्षाला रडणारी नव्हे लढणारी फौज हवी आहे, याची जाणीव असू द्या.

>पाण्याची समस्या संपलेली नाही. त्यामुळे जुलैअखेरपर्यंत टँकर सुरू राहावे यासाठी मी स्वत:च प्रयत्न करणार आहे.