आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP Leader Gopinath Munde Attack On State Government For Water Shortage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र : 2600 कोटींचे महागडे बॅरेजेस उभारले कशासाठी?, गोपीनाथ मुंडेंचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जगातील कुठल्याच देशाने बांधले नसतील एवढे 2600 कोटी रुपये खर्च करून महागडे बॅरेजेस राज्य सरकारने मराठवाड्यात कशासाठी उभारले आहेत. असा सवाल भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी सोमवारी (18 फेब्रुवारी) केला. एवढय़ा खर्चात हजारो चेक डॅम तयार करता आले असते. राज्यावर ओढवलेला दुष्काळ हा मानवनिर्मित असून यास सत्ताधारी जबाबदार आहे अशी टीकाही त्यांनी केली.

राजेसंभाजी साखर उद्योग कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार मुंडे म्हणाले, राज्यातील साखर कारखानदारी ही शेतकर्‍यांच्या जिवावर टिकून असल्याने प्रत्येक कारखान्याने जनावरांसाठी एक छावणी सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले. परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्यास मागील वर्षी 12 कोटींचा नफा झाल्याने 10 छावण्या काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. देशाचे कृषिमंत्री राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास जात नाही व मुख्यमंत्री कृषिमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहत नाही. राज्य दुष्काळात होरपळत असताना सत्ताधारी मात्र एकमेकांच्या ‘अडवा व जिरवा ’कार्यक्रमात मग्न असल्याची टीका केली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री हरिभाऊ बागडे होते. प्रमुख उपस्थिती खासदार रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार संदिपान भुमरे, नॅचरल शुगरचे बी. बी. ठोंबरे, उद्योगपती राम भोगले, पद्माकर मुळे, रा. स्व. संघाचे अनिल भालेराव, माजी महापौर डॉ. भागवत कराड, भाजप शहर जिल्हाध्यक्ष बापू घडामोडे, सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन सुरेश बनकर, अतुल सावे, प्रदीप पाटील, कारखान्याचे चेअरमन अंबरवाडीकर, दामोदर नवपुते आदींची उपस्थिती होती.

साखर उद्योगासंबंधी धोरण ठरवावे

केंद्र व राज्याचे आयात निर्यातीसह साखर उद्योगासंबंधीची 10 वर्षांसाठीची नीती जाहीर करावी. यंदा साखर उद्योग अडचणीत सापडलेला आहे. देशात तयार होणार्‍या साखरेपेक्षा विदेशातून आयात केली जाणारी साखर स्वस्त आहे. जगातील साखरेचे भाव ब्राझीलमधून ठरतात. ब्राझीलमध्ये साखर व इथेनॉलचे प्रत्येकी एक वर्ष सलग उत्पादन घेतले जाते. या वर्षी केवळ साखरेचे उत्पादन घेतल्याने मोठय़ा प्रमाणावर साखर देशात येईल.

तीन मागण्यांवर जोर
संसदेच्या अधिवेशनात पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल टाकण्याची परवानगी देऊन इथेनॉलचा भाव वाढवावा. साखर उद्योगाच्या अभ्यासासाठी तयार करण्यात आलेल्या रंगराजन समितीच्या शिफारशी मान्य करा. शासन खरेदी करीत असलेल्या साखर कारखान्यातील विजेचा भाव वाढवून द्यावा.

हिंगोलीत कारखाना
मराठवाड्यात सर्वत्र कारखाने काढले असून केवळ हिंगोली जिल्ह्यातच आपला साखर कारखाना नसल्याचे मुंडे यांनी सांगितले. लवकरच आता हिंगोलीत साखर कारखाना काढणार असल्याची घोषणा केली.

लेव्हीवरील बंदी सरकारने उठवावी
केंद्राने साखर उद्योगास जखडून टाकले आहे. लेव्हीवरील बंदी मागे घेतल्यास साखर कारखान्यांना बाजारभावाप्रमाणे साखर विकण्याचा मार्ग मोकळा होईल.