आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरिभाऊ बागडे यांनी सुरू केली लोकसभेची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगाच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन लोकसभेतील भाजपा उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते सोमवारी (18 फेब्रुवारी) होत आहे. या निमित्ताने कारखान्याचे सर्वेसर्वा माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली असल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू झाली आहे.

बागडे यांनी औरंगाबाद तालुक्यातील चितेपिंपळगाव येथे छत्रपती संभाजीराजे हा खासगी कारखाना स्थापन करून मागील काही वर्षांत ऊस व पाण्याची टंचाई असताना यशस्वी चालवण्याची किमया केली आहे. आता सहवीजनिर्मिती प्रकल्पही सुरू करण्यात येत आहे. महिनाभरापासून ही वीज शासनाला विकत देण्यात येत आहे.

पक्षीय दलबदल

नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर बागडे यांनी त्यांचे निकटवर्तीय बनण्याचे प्रयत्न सुरू केले होते. 2010 मध्ये त्यांना मुंडेंसह कारखान्यावर आणले होते, तर देवगिरी बॅँकेच्या शाखेचे उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. गडकरी पायउतार होताच ते आता गोपीनाथ मुंडे यांच्या गुड बुकमध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.

लोकसभेची चाचपणी

जालना लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजप खासदार रावसाहेब दानवे 1999 पासून करीत आहेत. 2014 मधील लोकसभेसाठी आपला विचार व्हावा यासाठी बागडेंनी आता कंबर कसली आहे. संघ परिवारासह शिवसेनेतील नेत्यांची मोट बांधण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे. रा. स्व. संघाच्या भक्कम पाठिंब्यावर दिल्ली गाठणे शक्य असल्याने त्यादृष्टीने आखणी केली जात आहे.

मतदारसंघातील बड्या नेत्यांना निमंत्रण

बागडे यांनी जालना येथील शिवसेनेतील बडे प्रस्थ समजले जाणारे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना यापूर्वी कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने कारखान्यावर कधीही बोलावलेले नव्हते; परंतु सोमवारच्या कार्यक्रमास त्यांनी खोतकर यांच्याबरोबरच जालना लोकसभा मतदारसंघातील पैठणचे माजी आमदार संदिपान भुमरे, सिल्लोडच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश बनकर यांना निमंत्रित करण्यात आल्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

साखर क्षेत्रास प्राधान्य

साखर कारखानदारीत काम करणारांना कार्यक्रमास बोलावले असून यातून राजकीय अर्थ काढला जाऊ नये. अर्जुन खोतकर यांनी माझ्या सल्ल्याने नुकताच रामनगर सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी घेतला आहे. हरिभाऊ बागडे, माजी मंत्री.

हरिभाऊ बागडेंइतकाच रा. स्व. संघ माझ्याही पाठीशी आहे. युती शासनाच्या काळात बागडे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांचे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांशी चांगले संबंध आहेत. जालना लोकसभा मतदारसंघातून लढण्याची भावना त्यांनी कधीच व्यक्त केली नाही. रावसाहेब दानवे, खासदार, जालना.