आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Lok Sabha Elections Would Be The 'graduates' Of Candidates

लोकसभा निवडणुकीनंतर ठरणार भाजपचा ‘पदवीधर’चा उमेदवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने भाजपच्या पदवीधर उमदेवार निवडीचा विषय मागे पडला आहे. पंधरा दिवसांत उमेदवारांची घोषणा करू, असे आश्वासन भाजपच्या इच्छुक उमेदवारांना गोपीनाथ मुंडे यांनी दिले होते. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपचा पदवीधरचा उमेदवार लोकसभा निवडणुकीनंतरच ठरवला जाणार आहे.
मुंडेंनी पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार 15 दिवसांत ठरवू, असे घोषित केल्यानंतर इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले होते. मात्र, मतदार नोंदणीचा कार्यक्रम संपल्यानंतर उमेदवार निवडीची चर्चाही थांबली. प्रवीण घुगे, विजया रहाटकर, शिरीष बोराळकर, बीडचे सतीश पत्की यांच्या नावांची चर्चा होती. त्यातच बाहेरचा उमेदवारही संपर्कात असल्याचे मुंडे यांनी सांगितल्यामुळे बाहेरचा उमेदवार कोण, यावर गुर्‍हाळ सुरू होते. मात्र, त्यानंतर उमेदवार निवडीवर भाजपत एकमत झाले नाही. या विषयावरून वाद निर्माण करण्यापेक्षा लोकसभेनंतर बघू अशी भूमिका पक्षाकडून घेण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहतो. त्यामुळे अगोदर उमेदवार घोषित करून नाराजी ओढवून घेण्यापेक्षा भाजपने लोकसभेनंतरच उमेदवार घोषित करण्याचा सावध पवित्रा घेतला आहे.
सध्या आमचे लक्ष लोकसभेकडे आहे. त्या दृष्टीने पक्ष बांधणी करण्याचे काम सुरू आहे. सर्वत्र बूथरचना तयार करण्याचे कामही विभागीय पातळीवर केले जात असल्याचे विभागीय संघटक प्रवीण घुगे आणि विजया रहाटकर यांनी सांगितले.
लोकसभा किंवा विधानसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार थेट दिल्लीत ठरतात. त्यासाठी अनेक महिन्यांपासून फिल्डिंग लावली जाते. एवढे होऊनही उमेदवार लवकर निश्चित होत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बी फॉर्म दिला जातो. त्यामुळे उमेदवाराला प्रचाराला वेळ मिळत नाही, अशी ओरड होते. या किचकट प्रक्रियेला फाटा देण्याबरोबरच कार्यकर्त्यांना हवासा उमेदवार देण्यासाठी ही प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.