औरंगाबाद - भाजपचा जाहीरनामा जनतेची दिशाभूल करणारा असून सरदार पटेल यांच्या पुतळ्यासाठी लोखंड गोळा करणार्या भाजपने पुन्हा राममंदिराचा नारा दिला आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली, तर केवळ विकासाचा नारा देणारे मोदी राममंदिराच्या नावाने मते मागत असल्याने त्यांचा खरा चेहरा उघड झाला, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली. तथापि, हा जाहीरनामा देशहित आणि देशाच्या विकासासाठी तयार करण्यात आल्याची प्रतिक्रिया युतीच्या नेत्यांनी केली आहे.
पटेलांसाठी लोखंड गोळा करणार की राममंदिर बांधणार? : भाजपने राममंदिराचा मुद्दा जाहीरनाम्यामध्ये घेतल्याच्या मुद्दय़ावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे म्हणाले, एकीकडे भाजप सरदार पटेलांच्या पुतळ्यासाठी लोखंड गोळा करत फिरत आहे. यापूर्वी त्यांनी राम मंदिराच्या नावाखाली गोळा केलेल्या विटा कुठे गेल्या? आधी पटेलांचा पुतळा उभारणार की राममंदिर बांधणार? असा भाजपमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आता भाजपने केवळ जनतेची दिशाभूल करू नये. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे म्हणाले, भाजपचा जाहीरनामा केवळ दिशाभूल करणारा असून विकासाच्या वाटेवर चालणे भाजपला परवडणारे नाही. त्यांची ती लायकीच नाही. त्यामुळे मोदींचा खरा चेहरा यानिमित्ताने जनतेसमोर आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण म्हणाले, सत्ता असताना भाजपने राममंदिर बांधले नाही. त्यामुळे केवळ राममंदिराच्या नावावर भावनेचे राजकारण केले जात आहे. केवळ जनतेला बनवण्याचा प्रकार भाजपच्या वतीने केला जात आहे.
देशाला विकासाकडे नेणारा जाहीरनामा
भाजपचा जाहीरनामा हा खर्या अर्थाने विकासाचा जाहीरनामा असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात फक्त घोषणा असतात. मात्र, भाजप जाहीरनाम्याची वचनपूर्ती करणारा पक्ष आहे. मोदी या जाहीरनाम्याची वचनपूर्ती करतील, असा विश्वासही कराड यांनी व्यक्त केला, तर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, हा जाहीरनामा देशाच्या विकासाकडे नेणारा असून त्यामुळे देशहित जपणारा हा जाहीरनामा आहे. महागाई रोखण्यापासून ते रोजगार, भ्रष्टाचार, काळे धन या सर्वांवर उपाय सांगणारा जाहीरनामा आहे.