आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP, NCP Political Party Latest News In Divya Marathi

पहिल्यांदाच विस्कटले "एकगठ्ठा', पर्याय उपलब्ध झाल्याने दलित, मुस्लिम मतांचे विभाजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दलित आणि मुस्लिम ही काँग्रेस व त्यानंतर काही काळ राष्ट्रवादीसाठी एकगठ्ठा मते देणारी पेढी. याच पेढीच्या भरवशावर अनेक वर्षे आघाडीच्या विजयाचे इमले चढत गेले, तर विरोधकांनी यात कशी फूट पडेल यावर आपल्या जयाची गणिते ठरवली. मात्र, यंदा औरंगाबाद शहरातील तिन्ही मतदारसंघाचा विचार करता प्रथमच ही सर्व एकगठ्ठा मते विस्कटली आहेत. त्यामुळेच येथे निर्णायक मते असूनही दलित आणि मुस्लिम म्हणतील तेच उमेदवार विजयी होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
गेल्या दोन निवडणुकांत शहरात आघाडी विरुद्ध युती अशी लढत झाली. तेव्हा वरील मते ही काँग्रेस आघाडीच्या बाजूने असल्याचे बोलले जात होते. प्रदीप जैस्वाल हे अपक्ष म्हणून विजयी होऊ शकले ते केवळ दलित मतांमुळेच असेही सांगितले जाते. यंदा मात्र चित्र बदलले आहे. एमआयएम या पक्षाच्या रुपाने मुस्लिमांना एक सक्षम व्यासपीठ निर्माण झाले. त्यामुळे काँग्रेसकडे जाणारी मते आपोआपच मोठ्या प्रमाणात या पक्षाकडे जाणार हे स्पष्ट झाले. काँग्रेसने मध्यमध्ये मुस्लिम उमेदवार दिला असला तरी त्यांचा पराभव केवळ एमआयएममुळेच होणार हे उघड गुपित चर्चेत आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षानेही येथे उमेदवार दिले आहेत. हा पक्ष आपल्याकडे मुस्लिमांचाच पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मुस्लिम मते दोन प्रकारांत विभागली गेली आहेत. त्याशिवाय त्यांच्यातील काही मते पारंपरिकपणे काँग्रेसकडे जातील तर काही मते राष्ट्रवादीकडे जातील हे उघड आहे. थोडक्यात, आघाडी असती अन् एमआयएम किंवा सपा हे मैदानात नसते तर एकगठ्ठा मते एकाच पक्षाच्या बाजूने गेली असती अन् विजयाची समीकरणे वेगळीच दिसली असती.

दलित मतांचा विचार करता हा मतदारही आघाडीच्या बाजूने जाणारा आहे. रिपाइंच्या निर्माणाने या मतांना पर्याय उपलब्ध झाला असला तरी तो कधीच सक्षम नव्हता हे वेळोवेळी दिसून आले. मात्र केडर बेस बहुजन समाज पक्ष, वेळोवेळी वेगवेगळ्या पक्षांबरोबर जाणारे रिपब्लिकन पक्ष यांच्यात काही प्रमाणात ही मते विभागली जात पण त्यांचे प्रमाण निर्णायक नव्हते. त्यातच पश्चिम मतदारसंघातून रिपाइंचे एका प्रमुख नेत्याने एमआयएम जवळ केल्याने हा समाज त्यांच्यासमवेत जातो की मुस्लिम समाजाला जवळ केले म्हणून नाराजी व्यक्त करतो हे १९ तारखेला दिसून येईल. दलितांची मते या वेळी कोणाबरोबर जाणार हे सांगता येत नाही. कारण रिपाइंतील एक घटक युतीबरोबर आहे तर दुसरे आघाडीबरोबर. त्यामुळे या समाजाची एकगठ्ठा मते कोणालाच मिळणार नाही हेही उघड आहे.
उमेदवार विजयी होण्याची शक्यता नसली तरी बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला भक्कम मतदान होते. त्याचा फायदा विरोधकांना आतापर्यंत होताना दिसला. मात्र या वेळी ही मते काही ठिकाणी युती, काही ठिकाणी आघाडी, काही ठिकाणी एमआयएमकडे जातील. त्यामुळे एकगठ्ठा दलित मते मिळू शकतात, असा दावा करणारा एकही पक्ष नाही. एकूणच आतापर्यंतची एकगठ्ठा मतांची पेढी या वेळी विस्कटली आहे.
पश्चिममध्ये अन्य निर्णायक
अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात दलित कोणाकडे जाणार यापेक्षा येथील अन्य समाज कोणाबरोबर जातो यावर बरेच काही अवलंबून आहे. सेना, भाजप यांचे तगडे उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने दलित आपलेच समजून गतवेळीही येथील निवडणूक लढवली होती. यंदा त्यांना राष्ट्रवादीशी टक्कर द्यायची आहे. एमआयएमचा येथील उमेदवारही दलित आहे. त्यामुळे अन्य समाज काय करतो यावर येथील निकाल ठरेल.