आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP News In Marathi, Marathwada, Lok Sabha Election, Divya Marathi

मराठवाड्यातील भाजपची जुनी फळी लोकसभेच्या प्रचारातून बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाने सत्तेसाठी अनेक वेळा तडजोड करताना जुन्या नेत्यांना डावलले. निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवार नसायचे तेव्हा निष्ठावंतांचा विचार व्हायचा. परिस्थिती बदलताच पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मराठवाड्यात भाजपला वाडी-तांड्यावर पोहोचवून नावारूपास आणणारे, किंबहुना पक्षाची गीता डोक्यावर घेऊन फिरणार्‍यांना खड्यासारखे बाजूला सारण्यात आले. मराठवाड्यातील भाजपच्या काही नेत्यांनी पक्षात सुरू असलेल्या नव्या प्रवाहाशी काळानुरूप जुळवूनही घेतले, काहींना अडचणी आल्या, काहींनी घरी बसणे पसंत केले. एकेकाळी पुंडलिक हरी दानवे व जयसिंगराव गायकवाड या भाजपमधील मुलुखमैदानी तोफा होत्या. त्यांचे धडधडणे आता बंद झाले आहे.
भारतीय जनता पक्षात मराठवाड्यातील रामभाऊ गावंडे, पुंडलिक हरी दानवे, हरिभाऊ बागडे व जयसिंगराव गायकवाड या दिग्गज नेत्यांवर एकेकाळी मोठी जबाबदारी असायची. पक्ष वाढत गेला. सत्ताप्राप्तीनंतर हळूहळू या मंडळींचे पक्षातील स्थान कमी होत गेले. नवनवीन विचारधारांची मंडळी येत गेल्याने नवीन समीकरणे जुळत गेली व निष्ठावंतांची गळचेपी होत गेली, ती आजही सुरू आहे.
जयसिंगराव गायकवाड : गोपीनाथ मुंडे व स्व. प्रमोद महाजन यांच्यासोबतच राजकारणात आलेले गायकवाड प्रथम 1990 च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीत 18 मतांनी पराभूत झाले. त्यानंतर 1991 मध्ये त्यांना मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली व ते विजयी झाले. 1995 मध्ये युती सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. राज्यमंत्री असताना पदवीधर मतदारसंघात रा. स्व. संघाचा विरोध असताना दुसर्‍यांदा विजयी झाले. 1998 मध्ये भाजपने बीडमधून उमेदवारी दिली व गायकवाड विजयी झाले. 1999 मध्ये पुन्हा बीडमधून लोकसभेवर गेले व केंद्रात काही काळ मंत्री झाले. मुंडेंशी मतभेद झाल्यानंतर 2004 मध्ये भाजपने उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीकडून खासदार झाले. 2009 मध्ये गायकवाड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने शिवसेना मार्गे पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले. मुंडेंशी सूत जमल्याने 2009 मध्ये गायकवाड यांनी लोकसभेला प्रचार केला. 2014 च्या लोकसभेला मात्र गायकवाड प्रचारात नाहीत.
पुंडलिक हरी दानवे : पीएचडी नावाने परिचित दानवे यांचा भारतीय जनसंघ, जनता पार्टी व भाजप असा प्रवास आहे. त्यांची जालना लोकसभेची उमेदवारी नेहमी ठरलेली असायची. तिला 1996 मध्ये ब्रेक लागला. दानवे 1977 व 1989 मध्ये जालना येथून खासदार होते. दोन्ही वेळा संसद अल्पकाळ टिकली. वाजपेयी लाटेत 1996 मध्ये दानवेंना उमेदवारी नाकारून पक्षाने जनता दलातून आलेल्या उत्तमसिंह पवार यांना उमेदवारी दिली. तेव्हा दानवेंनी बंड केले. श्रेष्ठींनी त्यांची समजूत घातली. उत्तमसिंह पवार दोन वेळा जालन्यातून भाजपचे खासदार राहिले, तेव्हाही संसद अल्पकाळ टिकली. पवार बाहेर पडल्यानंतरही दानवे भाजपतच होते. अखेर 2003 मध्ये त्यांनी भाजप सोडला व पुत्र चंद्रकांत दानवेला भोकरदन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आणले. चंद्रकांत आजपर्यंत आमदार आहेत. परंतु दानवे सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.
रामभाऊ गावंडे : औरंगाबाद जिल्ह्यातील जनसंघापासूनचे कार्यकर्ते. रा. स्व. संघाच्या मुशीत तयार झालेले. सर्वप्रथम 1974 मध्ये भारतीय जनसंघाच्या माध्यमातून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली. तेव्हा काँग्रेसचे माणिकराव पालोदकर विजयी झाले. 1978 ते 1980 जनता पार्टीचे आमदार म्हणून औरंगाबाद पूर्व (फुलंब्री) विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. गावंडे यांचे हरिभाऊ बागडेंशी बिनसल्याने 1994 मध्ये औरंगाबाद पूर्वमधून त्यांनी बंडखोरी केली. या वेळी बागडे विजयी झाले व महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. गावंडे यांना तेव्हा भाजपतून काढून टाकण्यात आले. 1999 मध्ये गावंडे-बागडे वाद मिटला व गावंडे यांनी विधानसभेला बागडेंचा प्रचार केला. आज गावंडे राजकारणातून निवृत्त झाले असून, चितेपिंपळगावला ते राहतात.
हरिभाऊ बागडे : 1985 ते 2004 पर्यंत भाजपचे औरंगाबाद पूर्व (फुलंब्री) मधून आमदार होते. युती शासन काळात राज्यात साडेचार वर्षे मंत्री होते. विधानसभेच्या 2004 व 2009 मधील निवडणुकीत फुलंब्रीतून पराभूत. लोकसभेसाठी 2014 मध्ये जालना मतदारसंघातून इच्छुक होते. पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून प्रचारातून अंग काढून घेतले. या वेळी त्यांचा सर्वाधिक रोष जालना लोकसभा मतदारसंघातील खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर असून त्यांच्याच प्रचारावर अघोषित बहिष्कार टाकलेला आहे. लालकृष्ण अडवाणी यांचा कार्यक्रम, उमेदवारी अर्ज भरणे अथवा इतर कुठल्याच कार्यक्रमास बागडे हजर राहिले नाहीत.